होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी साडेतीन हजार पानांचे पुरावे

मराठा आरक्षणासाठी साडेतीन हजार पानांचे पुरावे

Published On: May 20 2018 1:43AM | Last Updated: May 19 2018 10:51PMसांगली : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी 3 हजार 500 पानांचे पुरावे गोळा केलेले आहेत. गॅझेट, संदर्भ ग्रंथ, पुस्तकांमधून हे पुरावे एकत्रित केले आहेत. सोमवारी कोल्हापुरात ते राज्य मागासवर्ग आयोगाकडे सादर केले जाणार आहेत, अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे संयोजक डॉ. संजय पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग जनसुनावणीसाठी सोमवारी (दि. 21) कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे येत आहे. सांगली जिल्ह्यातून मराठा समाजबांधव, मराठा संघटनांकडून राज्य मागासवर्ग आयोगाला निवेदने देणार आहेत. आयोगाकडे एक लाखावर निवेदन सादर होतील, अशी अपेक्षा आहे. सध्या 35 हजार निवेदने मराठा क्रांती मोर्चाकडे आलेली आहेत. समाजातील विविध संस्था, संघटना व मराठा समाजबांधव उत्स्फूर्तपणे उपस्थित राहूनही आयोगाला निवेदन देणार आहेत, अशी माहिती डॉ. पाटील यांनी दिली. यावेळी प्रशांत भोसले, राहुल पाटील, विलास देसाई उपस्थित होते. 

डॉ. पाटील म्हणाले, मराठा समाज हा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचे अनेक पुरावे एकत्र केले आहेत. अन्य कुणांकडे अशाप्रकारचे पुरावे असतील तर ते आयोगाकडे सादर करावेत. कुणबींना ओबीसी आरक्षण आहे. मराठे हे कुणबीच आहेत. मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मराठा समाजातील अनेक कुटुंबांकडील जुनी भांडी, रांजण, ताम्रपट यावर कुणबी असा उल्लेख आहे. ते पुरावेही आयोगाकडे द्यावेत.  

डॉ. पाटील म्हणाले, राज्य मागासवर्ग आयोगाला निवदेनासाठी 450 गावांत बैठका झालेल्या आहेत. 350 ग्रामपंचायतींचे ठराव झाले आहेत.आणखी ग्रामपंचायतींचे ठराव आले असते. ज्या ग्रामपंचायतींचे ठराव अद्याप आलेले नाहीत, त्यांचे ठराव स्वतंत्रपणे आयोगाकडे सादर केले जाणार आहेत.

अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी म्हटले आहे की, राज्य मागासवर्ग आयोगाकडील जनसुनावणीस मोठ्या संख्येने उपस्थित राहून निवेदन द्यावीत.