होमपेज › Sangli › माधवनगर येथे धडक मोर्चा, रास्ता रोको

माधवनगर येथे धडक मोर्चा, रास्ता रोको

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 8:05PMमाधवनगर : वार्ताहर

मराठा समाजाला तातडीने आरक्षण द्यावे या मागणीसाठी माधवनगर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दि. 9 ऑगस्ट रोजी पुन्हा मुलाबाळांसह व गुरा - ढोरांसह  चक्‍काजाम आंदोलन करण्याचा इशारा  देण्यात आला. 

गुरुवारी सकाळी 9 वाजता गांधी चौकात मराठा समाजाचे लोकप्रतिनिधी व विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जमा झाले. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाला सुरुवात झाली. मराठा आरक्षणासाठी राज्यभरात  बलिदान दिलेल्या तरुणांच्या प्रतिमा असलेला फलक मोर्चाच्या अग्रभागी होता. मोर्चात सरपंच अनिल पाटील, ग्रामपंचायत सदस्य जयदीप कदम, सदस्य पिंटू बागल, देवा जाधव, सुधीर पाटील, राजू कदम आदी सहभागी झाले होते.

दिनकरअण्णा साळुंखे  म्हणाले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेनुसार समाजात समानता येण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे आहे. मात्र, आंदोलन करूनही शासन आमच्या मागणीची दखल घेत नाही, म्हणून दि. 9 ऑगस्ट रोजी आम्ही मुलाबाळांसह व गुरा- ढोरासह रस्त्यावर उतरून चक्‍काजाम आंदोलन करुन  शासनाला आरक्षण देण्यास भाग पाडू. प्रताप  विचारे म्हणाले, मराठा आरक्षणाचे आंदोलन कोणत्याही पक्ष, संघटनेविरूध्द नाही.  सरकारने आमची न्याय मागणी मान्य करावी, अन्यथा सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडू. 

शिवाजी डोंगरे म्हणाले, मराठा समाज सरकारसोबत रहावा असे सरकारला वाटत असेल तर  तातडीने आरक्षण जाहीर करावे. मनसेचे शहराध्यक्ष नामदेव पाटील, रिपाइंचे शहर अध्यक्ष जितेंद्र पवार या रास्ता रोकोमध्ये सहभागी झाले होते. रास्तारोकोनंतर आंदोलकांनी गांधी चौक येथे जाऊन एक दिवसाचे ठिय्या आंदोलन केले. यावेळी तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.