Wed, Jul 24, 2019 05:43होमपेज › Sangli › मराठा आरक्षणासाठी कृष्णा नदीत अर्ध जलसमाधी

मराठा आरक्षणासाठी कृष्णा नदीत अर्ध जलसमाधी

Published On: Aug 13 2018 1:22AM | Last Updated: Aug 12 2018 8:57PMइस्लामपूर : वार्ताहर

मराठा आरक्षणासाठी सरकारला जाग यावी, यासाठी मराठा समाजातील तरूणांनी बहे (ता. वाळवा) येथील कृष्णा नदीत अर्ध जलसमाधी घेतली. यावेळी विधीवत पूजा करत सरकारचे दिवसही आंदोलकांनी घातले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर येथे मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.  

येडेमच्छिंद्र, नरसिंहपूर, शिरटे, बहे परिसरातील अनेक तरूण बहे येथील कृष्णा नदीकाठी जमले होते. महाराष्ट्र बंदवेळी येडेमच्छिंद्र येथील शेकडो तरूणांनी मुंडण करत सरकारचा निषेध केला होता. आज याच तरूणांनी कृष्णा नदीकाठाला मंत्रोपचार व पूजा करत सरकारचे दिवस घातले. यावेळी सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर तरूणांनी नदीपात्रात जावून अर्ध जलसमाधी घेतली. 

सरकार आरक्षण देण्यासाठी चालढकल करत आहे. या सरकारला आरक्षण देण्यासाठी सद्बुद्धी मिळो, अशी मागणी आंदोलकांनी केली. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी  पोलिसांनी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवला होता. 

15 ऑगस्टला अध्यादेशाची होळी...

आरक्षणासाठी सरकार जाणीवपूर्वक चालढकल करून  वेळकाढूपणाचे धोरण अवलंबत आहे. आरक्षणासाठी काढलेला अध्यादेश काहीच कामाचा नाही. त्यामुळे या अध्यादेशाची 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी ठिकठिकाणी होळी करण्याचा निश्चयही यावेळी करण्यात आला. या होळीबरोबरच प्लास्टिकमुक्तीचीही होळी करण्यात येणार आहे.