Thu, Apr 25, 2019 23:40होमपेज › Sangli › मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : ना. पाटील

मराठा मोर्चा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार : ना. पाटील

Published On: Sep 12 2018 1:49AM | Last Updated: Sep 11 2018 11:57PMसांगली : प्रतिनिधी

मराठा क्रांती मोर्चात ज्या ठिकाणी  गंभीर स्वरूपाचे प्रकार झालेले नाहीत. तसेच  तशा स्वरूपाच्या गुन्ह्यांत ज्यांचा प्रत्यक्ष सहभाग नाही, त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात येतील, अशी ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे दिली. 

राज्यातील पहिल्या मराठा विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन ना. पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वय श्रीरंग पाटील यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. त्यावर मंत्री पाटील यांनी तशी ग्वाही दिली. 

सहकारमंत्री सुभाष देशमुख, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, महापौर संगीता खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील आदी उपस्थित होते. 

ना. पाटील  म्हणाले, आंदोलकांवर दाखल  गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. जिल्हाधिकारी,  पोलिस अधीक्षक त्या समितीत असतील.  मात्र ज्यांच्याकडून  पोलिसांवर हात उचलण्याचा प्रयत्न झाला. त्यांच्यावरील गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत. अन्यथा  कायद्याचा धाक राहणार नाही. 

ना. पाटील म्हणाले, टिकणारे आरक्षण देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरूच आहे. हे आरक्षण लागू होण्याआधीच आरक्षणातील सवलती देण्यास सुरूवात केली आहे. एकशे पाच अभ्यासक्रमांसाठी पन्नास टक्के शुल्कसवलत देण्यात येत आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्जाचे व्याज सरकार भरणार आहे. या कर्जा संदर्भात विमा कंपनीबरोबर चर्चा सुरू असून करार झाल्यानंतर थकहमी सरकार देणार आहे. त्यानंतर कर्ज उपलब्ध होण्यास कोणतीही अडचण येणार नाही. 

सहकारमंत्री देशमुख म्हणाले, मराठा समाजाच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. वसतीगृहाच्या भाड्यासाठी सरकार अनुदान देणार आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळातर्फे कर्ज देण्यासाठी ऑनलाईन अर्ज घेतले जात आहेत. विनातारण, विनाजामीन कर्ज उपलब्ध होणार आहे. सरकारने आता हमी घेतली आहे. मराठा समाजाला कोठेही  अडचण येणार नाही. त्यामुळे कोणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नका.  वसतीगृहासाठी मदत करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगरसेवक राजू कुंभार, कल्पना कोळेकर, मराठा क्रांती मोर्चाचे डॉ. संजय पाटील, महेश खराडे, आशा पाटील, विलास देसाई आदी उपस्थित होते. 

जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा तयारीसाठी मदत 

मराठा समाजातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा तयारीसाठी पुणे येथे केंद्र सुरू करण्यात येत आहे. विदेशात पीएच.डी. करणार्‍या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात आहे. त्याशिवाय, आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना मदत देण्याचा सरकारचा विचार आहे, असेही ना. पाटील यांनी सांगितले.