Mon, Aug 19, 2019 11:07होमपेज › Sangli › मराठा समाजाची बदनामी थांबवा

मराठा समाजाची बदनामी थांबवा

Published On: Aug 11 2018 1:22AM | Last Updated: Aug 10 2018 8:27PMसांगली : प्रतिनिधी

मराठा समाजाला आरक्षण देण्यासह राज्य शासनाने केलेल्या घोषणांची अंमलबजावणी करावी तसे शासनाकडून सुरू असलेली मराठा समाजाची बदनामी थांबवावी, अशा मागण्या करीत गुरुवारी मराठा क्रांती मोर्चातर्फे शहरातील स्टेशन चौकात दिवसभर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी सरकारविरोधात दिलेल्या घोषणांनी सारा परिसर दणाणून गेला. 

मराठा क्रांती मोर्चातर्फे गुरुवारी   महाराष्ट्र बंदची घोषणा करण्यात आली होती. सांगलीतील क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी स्टेशन चौकात धरणे आंदोलनाची घोषणा केली होती. गुरुवारी सकाळपासूनच मराठा समाज बांधवांची गर्दी  स्टेशन चौकाकडे जात होती.  माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ठिय्या आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मराठा युवक आणि युवतींचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी समाजातील अनेक युवक, युवतींनी आरक्षणाअभावी शिक्षणात येत असलेल्या अडचणींचा लेखा-जोखा मांडला. 

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदनही देण्यात आले. मराठा  आरक्षण देण्याबाबत शासनाचे धोरण वेळकाढूपणाचे आहे. न्यायालयात मांडली जाणारी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा यामध्ये तफावत आहे. मुख्यमंत्री मराठा समाजाची बदनामी करीत असून जातीयवाद निर्माण करीत आहेत. खोटी माहिती, फसव्या घोषणांद्वारे मराठा तरुणांना उसकावून त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा सरकारचा डाव आहे, असे निवेदनात म्हटले आहे. 

मेगाभरतीद्वारे समाजाची फसवणूक

भाजप सरकारने आर्थिक कोंडीचे कारण पुढे करीत नोकर भरती रद्द केली होती. तरीही मराठा समाजामुळे मेगाभरती रद्द केली असे मुख्यमंत्र्यांचे म्हणणे चुकीचे आहे. या बेजबाबदार वक्तव्यांमुळे इतरांना  मराठा समाजाविरोधात भडकवण्याचे काम झाले आहे. त्यांनी समाजाची बदनामी केली आहे, असेही म्हटले आहे. 

शुल्क प्रतिपूर्ती योजना

राजर्षि छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजना  आर्थिक मागास असलेल्या सर्वांसाठी लागू आहे. पण ती केवळ मराठा समाजासाठी असल्याची खोटी घोषणाबाजी थांबवावी, छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास योजना राज्यातील आर्थिक मागास समाजासाठी असताना ती केवळ मराठा समाजासाठी असल्याची घोषणाबाजी केली आहे, मराठा विद्यार्थी वसतिगृहाचीही घोषणा सर्वाधिक फसवणुकीची आहे, असेही निवेदनात म्हटले आहे. 

यावेळी डॉ. संजय पाटील, सतीश साखळकर, नितीन चव्हाण, प्रशांत भोसले, रोहितकुमार शिंदे, नगरसेवक उत्तम साखळकर, नगरसेवक अभिजित भोसले, दिग्विजय मोहिते, प्रा. पद्माकर जगदाळे, श्रीनिवास पाटील, महेश खराडे, अंकित पाटील, प्रथमेश पाटील, आशा पाटील, वैशाली भोसले, ज्योती चव्हाण, लता डफळे, नेत्रा कुरळपकर, हजारो मराठा युवक, युवती, महिलांसह समाजबांधव उपस्थित होते.