Tue, Jun 18, 2019 22:49होमपेज › Sangli › क्रांतिदिनी जिल्ह्यात चक्का जाम

क्रांतिदिनी जिल्ह्यात चक्का जाम

Published On: Aug 06 2018 1:55AM | Last Updated: Aug 05 2018 10:29PMसांगली : प्रतिनिधी

सरकारने मराठा समाजाला 9 ऑगस्टपर्यंत आरक्षण द्यावे, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करणार असल्याची माहिती मराठा स्वराज्य संघाचे नेते महादेव साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत दिली. मुख्यमंत्र्यांनी समाजाची फसवणूक केल्यामुळे फडणवीस सरकार चले जाव आंदोलन हाती घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

साळुंखे म्हणाले, मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आरक्षणासाठी शांततेत 58 मोर्चे काढले. परंतु सरकारला याचे काहीही गांभिर्य नाही.  मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देतो, असे आश्‍वासन दिलेले आहे. परंतु त्यांनी समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे मराठ्यांची तरूण मुले आत्महत्या करीत आहेत. त्यांच्यावर नोकर्‍यांमध्ये अन्याय होत आहे. मराठा समाज मोर्चे काढत असताना मुख्यमंत्री मात्र मोर्चामध्ये अतिरेकी असल्याचे सांगून अफवा पसरवत आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही आरक्षण देण्याचे आश्‍वासन दिले होते. शिवस्मारकामध्ये राजकारण आणले गेले.   मुख्यमंत्री जातीयवादी राजकारण करीत आहेत. धनगर, लिंगायत, मुस्लिम व मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवले आहे. याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत.

मराठा समाजाने सरकारला 9 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिलेला आहे. त्यानंतर  संपूर्ण राज्यात समाज   रास्तारोको, धरणे, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाला घेराओ आंदोलन करणार आहे. जिल्ह्यातही चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी पुतळ्याजवळ बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  यावेळी अधिकराव पाटील, सुभाष गायकवाड, मच्छिंद्र बाबर, बाळासाहेब जाधव, वसंतराव चव्हाण, साहेबराव मोरे, अविराज शिंदे, रमेश शिंदे,  आर. बी. पाटील, प्रदीप सव्वाशे, शरद पवार   उपस्थित होते.