Mon, Nov 19, 2018 04:48होमपेज › Sangli › आंब्याची आवक दुप्पट दर निम्म्यावर

आंब्याची आवक दुप्पट दर निम्म्यावर

Published On: May 06 2018 1:10AM | Last Updated: May 06 2018 12:27AMसांगली : प्रतिनिधी

सांगलीत विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी आंब्याची आवक दुपटीहून अधिक झाली आहे. त्यामुळे दर निम्म्यावर आला आहे. आंबा आता सर्वसामान्यांच्या आवाक्यात आला आहे. रत्नागिरी हापूसच्या 4 ते 6 डझन आंब्याच्या पेटीचा दर 700 ते 2000 रुपयांपर्यंत खाली घसरला आहे.

अक्षय तृतीयेच्या दरम्यान आंब्याने बराच ‘भाव’ खाल्ला. कोकणच्या आंब्याला वादळ, पावसाचा फटका बसला होता. परिणामी पहिल्या तोडीतील आंब्याची आवक कमी होती. फळे व भाजीपाला मार्केटमध्ये रत्नागिरी हापूसच्या 4 ते 6 डझन आंब्याच्या पेटीचा दर 2 हजार ते 4 हजार रुपये होता. देवगड हापूसच्या एक डझन आंब्याच्या बॉक्सची किंमत 500  ते 700 रुपये होती. आता कोकण व कर्नाटकी आंब्याची मार्केटमध्ये रेलचेल झाली आहे. आवक दुपटीहून अधिक वाढली आहे. 

सांगलीत फळे व भाजीपाला मार्केटमध्ये शनिवारी रत्नागिरी हापूसचा 4 ते 6 डझनच्या पेटीचा दर 700 ते 2000 रुपये झाला आहे. दर निम्म्यावर आला आहे. देवगडच्या एक डझनच्या बॉक्सचा दर 300 ते 500 रुपयांपर्यंत खाली आला आहे. कर्नाटकी आंब्याचा 2 डझनचा दर 300 ते 400 रुपये आहे, अशी माहिती फ्रुटस् मर्चंटस् असोसिएशनचे शिवाजी सगरे यांनी दिली. विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला मार्केटमध्ये कलिंगडचा डझनचा दर 50 ते 400 रुपये आहे.