Tue, Apr 23, 2019 10:18होमपेज › Sangli › पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

Published On: May 26 2018 12:51AM | Last Updated: May 26 2018 12:46AMइस्लामपूर : वार्ताहर

सततच्या कौटुंबिक वादाला कंटाळून येथील शाहूनगर परिसरातील   आनंदा बाबुराव देसाई (वय 52) यांनी  पत्नी आशा (वय 45) हिच्या डोक्यात हातोड्याने घाव घालून तिचा निर्घृण खून केला.  नंतर ब्लेडने डाव्या हाताच्या नसा कापून स्वत:ही आत्महत्त्या केली. हा धक्‍कादायक प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. हा प्रकार सायंकाळी उघडकीस आला.  याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी ः आनंदा देसाई रिक्षाचालक होते. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. यापूर्वी ते संभाजी चौक परिसरात   राहत होते. 

काही दिवसापूर्वी ते घर विकून देसाई कुटुंब शाहूनगर  परिसरातील दुसर्‍या गल्लीमध्ये रणजित पाटील यांच्या बंगल्याच्या पाठीमागे दोन खोल्यांमध्ये भाड्याने राहत होते. देसाई यांना दोन वर्षांपूर्वी अर्धांगवायू झाला होता. त्यांना चालता येत नव्हते.  वॉकरच्या सहाय्याने दवाखान्यात उपचारांसाठी जात होते.  या आजाराला ते कंटाळले होते. त्यांच्यावर कर्नाटक येथील नागरमुनोळी येथे  उपचार सुरू होते.   आजारपणामुळे ते घरीच असल्याने पती-पत्नीत नेहमी खटके उडत होते. या सततच्या भांडणाला ते वैतागले होते. याच कारणातून त्यांनी आज पत्नीचा हातोड्याने डोक्यात घाव घालून व स्वत:च्या हाताच्या नसा कापून घेवून आत्महत्या केली. त्यांना हर्षल व अभिषेक ही दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे विवाह झाले आहेत. अभिषेक हा पहिल्या पत्नीचा मुलगा आहे. तो  पत्नीसह कामेरी येथे राहतो. हर्षल वाणिज्य शाखेत पहिल्या वर्षात शिकत आहे. गुरूवारी सकाळी 9 वाजता तो मित्रांसमवेत कोल्हापूरला गेला होता. तो गुरूवारी कोल्हापुरातच राहिला होता. 

...आई झोपली आहे!

कोल्हापुरात पोहोचल्यानंतर हर्षलने शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता घरी फोन केला. वडिलांशी बोलल्यानंतर त्याने आईकडे फोन  द्या, असे तो वडिलांना म्हणाला. यावर वडिलांनी आई झोपली आहे. नंतर फोन कर, असे सांगितले. त्यानंतर त्याने दोनवेळा घरी फोन केला.परंतु वडिलांचा काही रिप्लाय मिळाला नव्हता. आईचाही मोबाईल लागत नव्हता. मात्र त्याच्या मोबाईलवर वडिलांनी काही मेसेज पाठविले होते. तो सायंकाळी 6 च्या सुमारास घरी आला. तेंव्हा घर बंद होते. त्याने घराचा दरवाजा ठोठावला तेंव्हा आतून वडिलांचा व आईचा काहीच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने खोलीची खिडकी उघडून पाहिली तेंव्हा वडील कॉटवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हर्षलने त्याच्या मित्रांना मोबाईलवरून संपक करून बोलवून घेतले. मित्रांनीही घरातील परिस्थिती पाहिल्यावर   तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकुमार मोरे, पोलिस हवलदार दिपक पाटील, हिंदुराव पाटील, देसाई, कांबळे, पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरवाजा आतून बंद असल्याने पोलिसांनी  खोलीचा दरवाजा मोडून आत प्रवेश केला. तेंव्हा आनंदा देसाई यांचा मृतदेह कॉटवर तर त्यांची पत्नी आशा देसाई या फरशीवर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. पोलिस उपअधीक्षक किशोर काळे यांनीही घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी कॉटच्या वरील बाजूस स्टूलवर इंजेक्शन सिरींज व ब्लेडपान आढळून आले. कॉटवर वरच्या बाजूला हातोडा पडलेला होता. आशा देसाई यांच्या डोक्यावर वर्मी घाव लागल्याने मोठा रक्तस्त्राव झाला होता.   देसाई यांच्या पायाला किरकोळ जखमाही झाल्या होत्या. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले.