Mon, Apr 22, 2019 12:25होमपेज › Sangli › मिरजेतील प्रमुख रस्त्याची दुरवस्था

मिरजेतील प्रमुख रस्त्याची दुरवस्था

Published On: Jun 11 2018 1:08AM | Last Updated: Jun 10 2018 11:05PMमिरज : प्रतिनिधी

गेले दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे स्टँड चौक-स्टेशन आणि सुखनिवास-पुजारी हॉस्पिटल रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यातील खड्ड्यात पाणी साचल्याने आणि संपूर्ण रस्ता चिखलमय झाल्याने या रस्त्यावरुन ये-जा करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे.आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील गल्ली बोळातील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रिटीकरण करण्यात आल्याने रस्ते चकाचक झाले आहेत. परंतु सार्वजनिक रहदारीच्या रस्त्याकडे मात्र महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शास्त्री चौक- गांधी चौकापर्यंत जाणारा शहरातील प्रमुख रहदारीचा रस्ता गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्षित आहे. विविध संघटना, रिक्षा संघटना यांच्या वारंवारच्या आंदोलनामुळे या रस्त्याचे केवळ जुजबी काम करण्यात आले आहे. शास्त्री चौक-तानंग फाटापर्यंतचा रस्ता प्रस्तावित रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे. याकरीता 100 कोटी रुपयांची तरतूद असल्याचेही सांगण्यात येते. मात्र रस्ता करण्याबाबत कोणत्याही हलचाली नाहीत. 

ठिकठिकाणी रस्त्यात महावितरणचे खांब तसेच आहेत. काही खाबांनी तर वेगवेगळा आकार घेतला आहे. तरीही धोकादायक बनलेले विद्युत खांब हलविण्याबाबत महावितरण कंपनीकडून सध्या कोणतीही हलचाल होत नसल्याचे दिसून येते.शहरातील गांधी चौक-बॉम्बे बेकरी, बॉम्बे बेकरी-लक्ष्मी मार्केट, लक्ष्मी मार्केट-स्टँड चौक, अग्निशमन कार्यालय-दत्त चौकापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. या प्रमुख रस्त्यासह गल्लीबोळातील रस्तेही करण्यात आले. मात्र महापालिका कार्यालया समोरील रस्ता करण्यात आला नाही. तसेच स्टँड चौक-रेल्वे स्टेशन, सुखनिवास-पुजारी हॉस्पिटल चौक पर्यंतचा रस्ताही दुर्लक्षित ठेवण्यात आला आहे. ड्रेनेज पाईपलाईनची खोदाई होणार असल्याचे कारण सांगण्यात येते. पाईपलाईन टाकून अनेक दिवस झालेतरी खोदाई करण्यात आलेली चर आणि रस्त्यातील खड्डे व्यवस्थित मुजविण्यात आलेले नाहीत. तात्पुरत्या स्वरुपात मुरूम टाकण्यात येतो. त्यामुळे सध्या पावसात हा रस्ता चिखलमय झाला आहे. रिक्षा संघटनांनी अनेकवेळा आंदोलनाची इशारे देऊनही महापालिकेकडून अद्याप दखल घेतल्याचे दिसत नाही. त्यामुळे दुचाकीस्वार, रिक्षाचालक यांना या रस्त्याने सर्कस करीत तरी जावे लागते किंवा रस्ता बदलून जावे लागते, अशी परिस्थिती आहे.