Sun, Mar 24, 2019 08:14होमपेज › Sangli › मुख्य संशयिताच्या मेहुण्याला अटक

मुख्य संशयिताच्या मेहुण्याला अटक

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 20 2018 11:18PMसांगली : प्रतिनिधी

वाहतूक पोलिस समाधान मांटे यांच्या खून प्रकरणातील मुख्य संशयित झाकीर अजमुद्दीन जमादार (वय 29, रा. ख्वाजा कॉलनी) याला शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला सात दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तर त्याला पळून जाण्यात मदत केल्याप्रकरणी त्याचा मेहुणा वासीम मिथुनलाल शेख (वय 27, रा. मिसाळवाडी, आष्टा) यालाही अटक करण्यात आली आहे. त्याला पाच दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास वेटरने सोडा पिण्याच्या कारणावरून  मांटे यांचा धारदार हत्याराने सपासप वार करून खून करण्यात आला होता. त्यानंतर बुधवारी झाकीरचे साथीदार राजू नदाफ, अन्सार पठाण यांना एलसीबीच्या पथकाने अटक केली होती. त्यांची रवानगीही पोलिस कोठडीत करण्यात आली आहे. यातील मुख्य संशयित झाकीर जमादार याला बुधवारी रात्री उशिरा कोल्हापुरातील राजवाडा पोलिसांनी अटक केली होती. त्याला गुरुवारी सांगली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली. दरम्यान मांटे यांचा खून केल्यानंतर झाकीर मिसाळवाडी येथे बुलेटवरून गेला होता. तेथे मेहुणा वासीम शेख याच्या घरी थांबला होता. 
या प्रकरणाचा तपास सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर यांच्याकडे देण्यात आला आहे. 

हॉटेल परिसरातच टाकले हत्यार...

समाधान मांटे यांच्यावर सपासप अकरा वार केल्यानंतर झाकीर हॉटेल परिसरात लावलेली त्याची बुलेट घेऊन पसार झाला होता. जाताना त्याने त्या परिसरातच खुनासाठी वापरलेले हत्यार टाकल्याची कबुली दिली आहे. त्याचे रक्ताने माखलेले कपडे, त्याने चेहर्‍यावर वापरलेला मास्क, हत्यार जप्त करण्याचे असल्याने त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकार पक्षातर्फे केल्यानंतर न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.