Tue, May 21, 2019 12:09होमपेज › Sangli › शिराळ्यात महाडिक, अभिजित पाटील रिंगणात?

शिराळ्यात महाडिक, अभिजित पाटील रिंगणात?

Published On: Aug 31 2018 1:42AM | Last Updated: Aug 30 2018 8:54PMइस्लामपूर : अशोक शिंदे

शिराळा विधानसभा मतदारसंघामध्ये निम्म्याहून अधिक मतदान असणार्‍या वाळवा तालुक्यातील 48 गावांमधून दोन  युवा उमेदवारांची नावे चर्चेत आहेत. आधीपासून गावागावांतून तळागाळातून ‘फिल्डिंग’ लावलेले सम्राट महाडिक आणि चिकुर्डे परिसरावर हुकुमत असलेले शिवसेनेचे अभिजित पाटील या दोन्ही उमेदवारांनी तयारी सुरू केली आहे. 

वाळवा तालुक्यातील सुमारे 94 गावांपैकी 48 गावे ही शिराळा विधानसभा मतदारसंघात आहेत. शिराळा मतदारसंघाचे मतदान 2 लाख 83 हजार 965 आहे. त्यापैकी वाळवा तालुक्यातील या 48 गावांत 1 लाख 47 हजार 42 मतदान आहे. यात  पुरुष मतदार 76 हजार 69 आणि महिला मतदार 70 हजार 973 आहेत.  तर फक्‍त शिराळा तालुक्यातील मतदारसंख्या 1 लाख 36 हजार 923 इतकी आहे. त्यामुळे  शिराळ्यापेक्षा वाळव्यातीलच मतदारसंख्या सुमारे 11 हजार मतांनी जास्त आहे. त्यामुळे वाळवा तालुक्यातील नव्या उमेदवारांची ‘एंन्ट्री’ देखील दमदार होऊ शकते. 

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे मतदान 2 लाख 62 हजार 287 आहे.  या मतदारसंघात असलेल्या मिरज पश्‍चिम भागातील 11 गावांतील  मतदारसंख्या 40 हजारांच्या आसपास आहे. अर्थात ही मतदारसंख्या जानेवारी 2018 ची असून दिवंगत, दुबार व स्थलांतरित मतदार वजा जाता अंतिम मतदारसंख्या दोन्ही विधानसभा मतदारसंघात बदलणार आहे.

आता महाडिक युवा शक्‍तीच्या माध्यमातून सम्राट महाडिक यांनी दोन्हीही तालुक्यांत संपर्क वाढविला  आहे. त्यामुळे आता ‘तिरंगी’ ऐवजी ‘पंचरंगी’ लढतीविषयी चर्चा सुरू झाली आहे. कुठल्याही पक्षात असले तरी पेठ, येलूर, रेठरेधरण या परिसरातील जिल्हा परिषद मतदारसंघात महाडिक गटाने आपले वर्चस्व सिध्द केले आहे. शिराळ्यातील तीन नेत्यांप्रमाणेच नव्या पिढीत असतानाही सामान्य लोकांची कामे करण्यात सम्राट महाडिक हे सक्रिय आहेत. त्यांची या निवडणुकीच्या अनुषंगाने ‘फिल्डिंग’ सुरू असताना आता शिवसेनेचे अभिजित पाटील हेदेखील रिंगणात येऊ पाहत आहेत. 

राज्यातील शिवसेना - भाजप युतीमधील पूर्वीच्या जागा वाटपामध्ये  इस्लामपूर व शिराळा हे मतदारसंघ शिवसेनेच्या वाट्याला आले होते. आता स्वतंत्र निवडणूक लढण्याचा भाजप - सेनेचा निर्णय झाला आहे. त्यामुळे वेगळीच रंगत निर्माण होणार आहे. शिवसेनेशी रोजगाराच्या निमित्ताने असलेला शिराळ्याचा मोठा संपर्क विचारात घेता चिकुर्डे परिसरातून सक्रिय असलेले शिवसेनेचे अभिजित पाटील हेदेखील  रिंगणात येण्याच्या तयारीत आहेत. 

त्यांनी सांगितले की, राज्यात स्वतंत्र लढण्याचा शिवसेनेचा अजेंडा आहे. त्यानुसार मतदारसंघामध्ये पक्ष बांधणीचा आदेश दिला आहे.   शिराळा विधानसभा आपण लढविणार आहे. त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.