Sun, Aug 25, 2019 19:13होमपेज › Sangli › श्रवणबेळगोळ येथे आज महामस्तकाभिषेक सोहळा

श्रवणबेळगोळ येथे आज महामस्तकाभिषेक सोहळा

Published On: Feb 17 2018 2:08AM | Last Updated: Feb 16 2018 11:43PMश्रवणबेळगोळ : सुनील पाटील

श्रवणबेळगोळ (कर्नाटक)  येथील गोमटेश भगवान श्री बाहुबली स्वामींच्या मूर्तीवर शनिवारी 88 वा महामस्तकाभिषेक सोहळा होणार आहे. 108 कलशांचा अभिषेक होणार आहे. दि. 25 फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा चालणार आहे. महास्तकाभिषेकाचा पहिला मान राजस्थानच्या अशोक पाटणी कुटुंबाला मिळाला असल्याची माहिती महोत्सव समितीचे राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांनी सांगितले. 

दर बारा वर्षांनी हा सोहळा होत असतो. यंदा दि. 17 ते 25 फेब्रुवारीदरम्यान हा सोहळा होत आहे.  पहाटे 5 ते 2 वाजेपर्यंत विधान होणार आहे. दोननंतर महामस्तकाभिषेकाला सुरुवात होणार आहे. 108 कलशांचा जलाभिषेक होईल. त्यानंतर पंचामृत अभिषेक, अष्टद्रव पूजा, मंगलारती  होईल.  6.30 ते 9.30 पर्यंत सर्वांना मूर्तीचे दर्शन घेता येणार आहे. 

रविवारी (दि. 18 ) सकाळी 8 ते 11 या वेळेत 1008 कलशाभिषेक, त्यानंतर 11 ते 1 पर्यंत पंचामृत पूजा, 1 ते 1.30 पर्यंत अष्टद्रव पूजा व महाआरती आणि दुपारी दोननंतर दर्शन आहे.

महामस्तकाभिषेकसाठी आंध्र प्रदेशच्या वन विभाकडून सुमारे  दोन टन रक्‍तचंदन, काश्मीरमधील किश्तवाढ व पाम्पोर येथून केशर आणले आहे. कर्नाटक दूध संघ दररोज 600 लिटर दूध पुरविणार आहे. हसन, टुमकूर आणि मंड्या जिल्ह्यातील भाविकांनी नारळ दिले आहेत. 

भाविकांसाठी समितीमार्फत  भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे. या विभागाची सर्व जबाबदारी राष्ट्रीय सचिव सुरेश पाटील यांच्यावर सोपविली आहे. वीस ठिकाणी भोजनालयांची उभारणी केली आहे. स्वस्तिश्री  चारूकिर्ती भट्टारक स्वामीजींचे या संपूर्ण यंत्रणेवर लक्ष आहे. 

सन्मती संस्कार मंच, वीर  सेवादल, भारत स्काउट गाईड, चंदाबाबा गुु्रपसह अन्य संघटनांचे स्वयंसेवक, संघटक, पदाधिकारी राबत आहेत. गॅस, दूध, भाजीपाला यासाठी सागर शेटे, अन्‍न धान्य पुरवठ्यासाठी अजित भंडे कार्यरत आहेत. दररोज शंभर टन साहित्य प्रत्येक भोजनालयात वाटप केले जात आहे. गोदामाची जबाबदारी प्रा. अशोक सकळे,पाणीपुरवठ्याची जबाबदारी मनोहर चौगुले, सुरेश मगदूम यांच्यावर सोपविली आहे.या सोहळ्यात परिसरातील गावातील लोक सहभागी आहेत. अखंड बारा तास सेवा दिली जात असल्याचे  सुरेश पाटील यांनी सांगितले. 

शे्रयसागर महाराज यांचे निर्वाण...

श्रवणबेळगोळ येथे 108 शे्रयसागर महाराज यांचे गुरूवारी दुपारी निर्वाण झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सेवा करण्यासाठी 300 हून अधिक त्यागी उपस्थित होते.