होमपेज › Sangli › विट्यात माघी गणेशोत्सवास प्रारंभ

विट्यात माघी गणेशोत्सवास प्रारंभ 

Published On: Jan 18 2018 3:34PM | Last Updated: Jan 18 2018 3:38PMविटा : प्रतिनिधी

'गणपती बाप्पा मोरया', 'गजानन गजानन मोरया' या जय घोषात विट्यात  सव्वाशेहून अधिक वर्षांची परंपरा असलेल्या माघी गणेशोत्सवास गुरुवारी प्रारंभ झाला. विशेष म्हणजे येथील गणेशाची उत्सव मूर्ती १३२ पेक्षा अधिक  वर्षांची आहे. तब्बल चार दिवस चालणाऱ्या या उत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. 

पहिल्या दिवशी परंपरेप्रमाणे सुशांत सुरेश भंडारे यांच्या घरापासून श्रींच्या उत्सव मूर्तींची पालखीतून सवाद्य मिरवणूक निघाली. मिरवणूक मार्गावर पायघड्या आणि रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या. फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. १८ ते २२ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या उत्सवात दररोज दुपारी महिलांचे भजन, पहिल्या दिवशी सायंकाळी 'नाचू कीर्तनाचे रंगी' हा सावता फुले यांचा कार्यक्रम, शुक्रवारी सांगलीचे संजय भिडे प्रस्तुत हिंदी-मराठी भावगीतांचा कार्यक्रम, शनिवारी वसंतराव हंकारे यांचे 'जगूया आनंदाने' या विषयावरील व्याख्यान, रविवारी दुपारी पुण्यातील प्रकाश शास्त्री लिमये यांचा

'श्रींचा पुराणातील जन्मकाळ' आणि  वासुदेव शास्त्री जोशी यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सांगतादिनी हत्ती, घोड्यांच्यासह सवाद्य मिरवणुकीने नगर प्रदक्षिणा होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन श्री गजानन मंदिर ट्रस्ट  तसेच विक्रम गुळवणी, काशिनाथ कुलकर्णी,  चैतन्य कुलकर्णी आदी करत आहेत.