Thu, Apr 25, 2019 03:36होमपेज › Sangli › मदन पाटील स्मारक, समाधीत घोटाळा

मदन पाटील स्मारक, समाधीत घोटाळा

Published On: Dec 20 2017 1:43AM | Last Updated: Dec 19 2017 10:52PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

ज्या नेत्यांच्या नावे कारभारी, ठेकेदार मोठे झाले, त्यांनी काँग्रेस नेते मदन पाटील यांच्या स्मारक आणि समाधीच्या कामात किमान एक कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. अगदी पुतळ्यातही टक्केवारी घेतली आहे, असा आरोप मनसेचे नेते माजी आमदार नितीन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले, निकृष्ट आणि भ्रष्ट कारभारामुळे मदनभाऊंच्या पुतळ्याची ओळखच हरवली आहे. पुतळा आणि स्मारक उभारणीच्या  सर्वच कारभाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली पाहिजे. ते म्हणाले, महापालिकेत रस्ते, गटारी, ड्रेनेज, पाणी, घरकुल, औषधे, स्मशानभूमीच्या ठेकेदारीपासून सर्वच कारभारात भ्रष्टाचार सुरू आहे. परंतु ज्यांचे नाव घेऊन राजकारण करतात, त्या नेत्याच्या समाधी आणि स्मारकालाही या लुटारूंनी सोडले नाही. उलट हे लुटीचे दुकान म्हणूनच त्यांनी या कामाकडे पाहिले. या दोन्ही कामांवर प्रत्येकी एक-एक कोटी रुपयांचा खर्च दाखविला. वास्तविक या कामांचा दर्जा आणि त्याची किंमत पाहिली तर किमान एक कोटी रुपये यांनी लुटले असावेत असे दिसून येते. 

शिंदे म्हणाले, मदन पाटील यांचा पुतळा त्यांच्यासारखा झाला नाही आणि दिसत नाही हे जगजाहीर आहे. पण कोणी बोलत नव्हते. पण  नगरसेवक सुरेश आवटी यांनीच हे प्रकरण चव्हाट्यावर आणले. या पुतळ्यावर 16 लाख रुपयांचा खर्च केला तोही संशयास्पद वाटतो आहे. 

ते म्हणाले, नेत्यांचे कारभार्‍यांना खरोखरच नाव करायचे असते तर या स्मारक आणि समाधीवर उधळपट्टी करण्यापेक्षा त्यांनी शहरात अद्ययावत भाजी मंडई उभी केली असती. उद्यान, क्रीडांगणांची अनेक उपनगरांत गरज आहे. ती कामे केली असती तर निदान त्यांचा समाजाला उपयोग झाला असता. पण ते न करता स्मारक, समाधीचे बोगस काम नेत्याच्या नावे खपवून भ्रष्टाचाराबद्दल कोणी बोलणार नाही, असे त्यांना वाटत असावे. 

शिंदे म्हणाले, या कारभाराची आयुक्‍तांनी चौकशी करावी. यातील दोषींवर कारवाई करावी. शिल्पकारामार्फत योग्य त्या पद्धतीने पुतळ्यात दुरुस्ती करावी. शिवाय यापुढे होणारा अनाठायी खर्च रोखून भाजी मंडई उभी करून त्याला मदन पाटील यांचे नाव द्यावे.  यावेळी अमर पडळकर, आदित्य पटवर्धन, सुनीता इनामदार, रोहित घुबडे, प्रियानंद कांबळे, चेतन भोसले, स्वप्नील कुंभोजकर, प्राची कुदळे, लीना सावर्डेकर उपस्थित होते.