Tue, Jul 16, 2019 00:16होमपेज › Sangli › सरकारला शिक्षणाचा खेळखंडोबा करू देणार नाही 

सरकारला शिक्षणाचा खेळखंडोबा करू देणार नाही 

Published On: Jan 24 2018 1:21AM | Last Updated: Jan 23 2018 11:10PMबागणी : प्रतिनिधी

सरकारला काय डिजिटल करायचे ते करू दे, बुलेट ट्रेन कोठे न्यायची ते नेऊ देत, पण राज्यकर्त्यांना शिक्षणाचा खेळखंडोबा करू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.  रयत शिक्षण संस्थेचे बहुजन समाजासाठीचे योगदान अतुलनीय असल्याचेही प्रतिपादन त्यांनी केले.  

वाळवा तालुक्यातील ढवळी येथे राष्ट्रीय जलतरणपटू सागर पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. डॉ. एन. डी. पाटील ग्रंथालय व अभ्यासिकेचे सुळे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या.  रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील अध्यक्षस्थानी होते.  

ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील, माजी खासदार रामशेठ ठाकूर,  ‘रयत’च्या सर्वसाधारण समितीच्या सदस्या सौ. सरोज नारायण पाटील,  सौ. विद्याताई पोळ, हवामान तज्ज्ञ डॉ.  जीवनप्रकाश  कुलकर्णी, ‘रयत’चे सचिव डॉ. भाऊसाहेब कराळे, सरपंच पद्मावती माळी प्रमुख उपस्थित होते.

खा. सुळे म्हणाल्या,  सरकार राज्यात 110 मराठी माध्यमाच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेत आहे. मात्र आम्ही तसा निर्णय घेऊ देणार नाही. गोरगरिबांच्या मुलांसाठीचे   शिक्षण सरकारला उद्ध्वस्त करू देणार नाही. त्याला प्रखर विरोध करू.

त्या  म्हणाल्या, या भागाने , जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, राजारामबापू पाटील यांच्यासारखे नेतृत्त्व घडविले. आज तीच परंपरा  आमदार जयंत पाटील  चालवित आहेत. डॉ. अनिल पाटील म्हणाले, कर्मवीरअण्णांच्या विचारांचा वारसा आणि वसा घेऊन रयतचे काम सुरू आहे. ढवळीच्या कनिष्ठ विद्यालयात इंटरनॅशनल स्कूल, कॅब सुविधा देण्याची तसेच जूनपासून येथे मागणी केल्यास टेक्निकल स्कूल देण्यात येईल, अशी  घोषणा   त्यांनी केली. संस्थेने बदलत्या काळाचा वेध घेत शिक्षणासह नोकरी देण्याची हमी देणारा आराखडा आखला असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

प्रा. डॉ.  पाटील म्हणाले, ग्रामीण भागातील बहुजन समाजातील मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी कर्मवीरअण्णांनी ‘रयत’ची स्थापना केली. ढवळी येथील या कनिष्ठ विद्यालयामुळे या आडवळणी भागातील मुला-मुलींसाठी दर्जेदार शिक्षणाची सोय उपलब्ध झाली.

सौ. सरोज पाटील यांनी स्वागत केले.   कर्मवीर अण्णा, रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. प्राचार्य एन. एस. माने यांनी आभार मानले. नववीतील विद्यार्थिनी राजनंदिनी  संजय देशमुख हिने तडाखेबाज भाषण करीत  उपस्थितांची मने जिंकली. सुप्रिया सुळे यांनीही तिचे कौतुक केले.  माजी आमदार विलासराव शिंदे, रयतचे विविध पदाधिकारी, मान्यवर उपस्थित होते.