Thu, Jul 18, 2019 20:43होमपेज › Sangli › रस्ते अपघात कमी करण्यासाठी आराखडा तयार करा

रस्ते अपघात कमी करण्यासाठी आराखडा तयार करा

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:11PMसांगली : प्रतिनिधी

रस्ते अपघातांबाबत जिल्हा राज्यात चौथ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे  अपघात कमी करण्यासाठी आराखडा तयार करा आणि त्याची अंमलबजावणी करा, असे आदेश खा. संजय पाटील यांनी शनिवारी अधिकार्‍यांना दिले. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या समितीच्या पहिल्याच बैठकीस  आमदार सुधीर गाडगीळ, शिवाजीराव नाईक, सुमनताई पाटील, जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, महापौर हारुण शिकलगार, उपप्रादेशिक परिवहन  अधिकारी दशरथ वाघुले, अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे आदी उपस्थित होते. 

रस्ता सुरक्षा समिती आतापर्यंत जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली होती. ती समिती बरखास्त करून खासदारांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. या समितीचे सर्व आमदार सदस्य आहेत. 

खासदार पाटील म्हणाले,   अपघात रोखण्यासाठी आणि रस्ता सुरक्षेसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध विभाग आदि संबंधित यंत्रणांनी आराखडा तयार करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.   

आमदार गाडगीळ म्हणाले, रस्त्यावर आवश्यक त्या ठिकाणीच आणि योग्य पद्धतीचे गतीरोधक असावेत. त्यावर पट्टे मारण्यात यावेत.  सिव्हिल चौकाचे रुंदीकरण करण्यात यावे. आमदार नाईक म्हणाले, पेठनाका येथे रस्त्याचे रुंदीकरण करून दिशादर्शकाचा फलक मोठ्या आकारात लावावा. 

जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, जिल्ह्यातील रस्ते अपघातासंदर्भात ब्लॅक स्पॉटची यादी तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यात अशा 31 ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करण्यात आले असून सुधारणांसह अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे.  

राष्ट्रीय महामार्ग अभियंत्यांना खडसावले

रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीस सर्व संबंधित विभागातील अधिकार्‍यांना बोलवण्यात आले होते. या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता अनुपस्थित होते. त्यांच्याशी खासदार पाटील यांनी मोबाईलवरून संपर्क साधून जोरदार खडसावले. त्यानंतर जिल्हाधिकारी पाटील यांनी त्या अभियंत्यास नोटीस काढण्याचे आदेश दिले.