होमपेज › Sangli › पाणी योजनांसाठी आघाडीच्या तुलनेत तिप्पट निधी 

पाणी योजनांसाठी आघाडीच्या तुलनेत तिप्पट निधी 

Published On: Feb 11 2018 12:56AM | Last Updated: Feb 11 2018 12:26AMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या कार्यकालात जिल्ह्यातील पाणी योजनांसाठी जितका निधी मिळाला त्याच्या तिप्पट  भाजप सरकारच्या काळात मिळाल्याचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

ते म्हणाले, टेंभू योजनेसाठी सुधारित प्रस्तावानुसार 1280 कोटी रुपये  मंजूर झाले आहेत. दोन वर्षांत हा निधी खर्चायचा असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे टेंभू, ताकारी, म्हैसाळ या सर्वच योजना आगामी वर्षभरात (लोकसभा निवडणुकीपूर्वी) पूर्ण होतील. शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचेल. पाणी योजनेच्या वीजबिलाचा प्रश्नही 81-19 या तोडग्यामुळे   आता कायमचा निकाली निघेल. 

पाटील म्हणाले, गेल्या 15 वर्षांत पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री सरकारमध्ये होते. केंद्रातही समविचारी सरकार होते. पण त्यांच्यासमोर अनुशेषाची अडचण होती. केंद्र शासनाकडून निधी मिळत  नव्हता. त्यामुळे निधीअभावी योजनेची कामे रखडली होती. 

ते म्हणाले, परंतु भाजप सरकारच्या काळात या योजनांना गती देण्यात आली.  आघाडी सरकारच्या  तुलनेत तीन वर्षांतच  तिप्पट  निधी मिळाला आहे.  ताकारी-म्हैसाळ योजनेसाठी यापूर्वीच 1680 रुपये मंजूर केले आहेत.  त्यांची कामे सुरू आहेत. टेंभूसाठीही निधीचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे हे खाते आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रयत्न करून दुष्काळग्रस्त जिल्ह्यांसाठी 8 हजार कोटी रुपये मंजूर करून घेतले. यासाठी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे त्या दोघांनी पाठपुरावा केला. टेंभूसाठी सुधारित प्रस्तावानुसार 1280 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. योजनेची कामे दीड वर्षांत पूर्ण होऊन जानेवारी 2019 पर्यंत शेतकर्‍याच्या बांधावर पाईपलाईनने पाणी पोहोचेल.