Fri, Jul 19, 2019 05:43होमपेज › Sangli › शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय  जमीन देणार नाही : राजू शेट्टी

शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय  जमीन देणार नाही : राजू शेट्टी

Published On: Feb 28 2018 1:12AM | Last Updated: Feb 27 2018 8:28PMबोरगाव : वार्ताहर

विकासाला शेतकर्‍यांचा विरोध नाही, पण शेतकर्‍याला उद्ध्वस्त करून कोणी विकासाची भाषा करीत असेल तर  स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन रस्त्यासाठी घेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कराड-तासगाव या 266 राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणावरून शेतकर्‍यांच्यात निर्माण झालेली  संभ्रमावस्था याबाबत तुपारी, दह्यारी, घोगाव कृती समितीच्या वतीने शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते  बोलत होते. 

बैठकीस राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता ए. जी. आडमुठे उपस्थित होते. रेठरेहरणाक्ष, दुधारी, ताकारी, तुपारी, दह्यारी, घोगाव, पलूस, बांबवडे येथील शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. त्यांनी विचारलेले प्रश्‍न, शंका, तक्रारी यांचे निरसन  अधिकार्‍यांनी  केले.

शेट्टी म्हणाले, शासनाकडे सध्या अस्तित्वात असणार्‍या रस्त्यावरच रूंदीकरण होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या संमतीशिवाय रस्त्यासाठी त्यांची जमीन संपादित करता येणार नाही. या रूंदीकरणात शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीची भरपाई रेडीरेकनरप्रमाणे मिळालीच पाहिजे.त्यासाठी प्रकल्पाचे अंदाजपत्रक वाढले तरी चालेल, पण शेतकर्‍याला शासनाने सढळ हाताने मदत करावी.

बायपास रोड व पूल ही कामे दुसर्‍या टप्प्यात होणार आहेत. बायपास रस्ता करताना तो पिकावू जमिनीतून न नेता तो डोंगराच्या बाजूकडून जावा, अशी त्यांनी मागणी  केली. या रस्ता रूंदीकरणात ताकारी, पलूससारख्या मोठ्या गावांतील बाजारपेठेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अशा अडचणीच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ता (बायपास)करण्याचा विचार शासनाचा आहे. हे काम दुसर्‍या टप्प्यात होणार आहे, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सयाजी मोरे, भागवत जाधव, प्रवीण पाटील, काका पाटील, अमर पाटील, शिवाजी मोरे उपस्थित होते.

रयत  क्रांतीचा  बार  फुसकाच...

खासदार शेट्टी यांची राज्य महामार्गाचे अधिकारी यांच्यासह होणारी बैठक उधळून लावण्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु  या  बैठकीकडे  रयत क्रांती  आघाडीचा  एकही कार्यकर्ता फिरकला  नाही.