Thu, Jun 20, 2019 07:11होमपेज › Sangli › माझ्या दुधात पाणी किती, ते वेळ आल्यावरच कळेल : राजू शेट्टी

‘माझ्या दुधात पाणी किती, ते वेळ आल्यावरच कळेल’

Published On: Jul 22 2018 12:59AM | Last Updated: Jul 22 2018 1:23AMइस्लामपूर : वार्ताहर

सदाभाऊ किरकोळ माणूस. त्याचे नाव माझ्यापुढे कशाला काढता? माझ्या दुधात पाणी आहे की नाही, ते वेळ आल्यावरच कळेल. थांबा आणि पाहा, असा अप्रत्यक्ष इशारा खासदार राजू शेट्टी यांनी ना.  खोत यांना दिला. येथे पत्रकार बैठकीत ते बोलत होते.  शेतकर्‍यांच्या एकीमुळेच दूध दर आंदोलन यशस्वी झाले. आता थकीत एफआरपीसाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

खासदार शेट्टी म्हणाले, परराज्यातील दूध उत्पादकांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी राज्यातील दूध उत्पादकांना अनुदानाची  गरज आहे. गोवा, कर्नाटक, गुजरातप्रमाणे शेतकर्‍यांना थेट अनुदान मिळायला हवे. त्याच अनुषंगाने आम्ही केलेली मागणी रास्त होती. ती सरकारने टाळली. आता घोषित केलेल्या अनुदानाची शासनाने अंमलबजावणी तातडीने करावी. जे दूध संघ शेतकर्‍यांना 25 रुपये दर देणार नाहीत त्यांना शासनाने अनुदान देऊ नये. 

या आंदोलनात राज्यातील शेतकरी ताकदीने उतरले त्यामुळेच हे आंदोलन यशस्वी झाले. काहींनी शेतकर्‍यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही ठिकाणी फोडाफोडी झाली. ही अ‍ॅक्शनला रिअ‍ॅक्शन होती, असे खासदार शेट्टी म्हणाले. 

सर्व पक्षांशी समान अंतर...

रघुनाथ पाटील यांच्या आरोपाबद्दल  शेट्टी म्हणाले,  मी भाजप, राष्ट्रवादी, काँगे्रस या सर्व पक्षांना सामील आहे असे रघुनाथदादांना वाटते. अजूनपर्यंत त्यांनी मी पाकिस्तानशी सामील आहे, असा आरोप केेलेला नाही हे आश्चर्य! त्यांनाही या प्रश्‍नासाठी आंदोलन करता आले असते. ते त्यांनी का केले नाही?
शेट्टी म्हणाले, मी फक्त शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाशी बांधिल आहे. सर्व राजकीय पक्ष मला समान अंतरावर आहेत. 

वेळ आल्यावर पहा...

ना. खोत यांच्या ‘दुधात पाणी आहे’ या आरोपाबद्दलच्या प्रश्‍नावर  शेट्टी म्हणाले, त्या किरकोळ माणसाचे नाव माझ्यासमोर कशाला  काढता? माझ्या दुधात पाणी आहे की नाही, हे वेळ आल्यावरच कळेल. या अनुदानाचे श्रेय आता अनेकजण घेत आहेत. मी तडजोडीसाठी सरकारच्या मागे लागलो नव्हतो. सरकारच माझ्या मागे लागले, असेही ते म्हणाले. 
विकास देशमुख, महेश खराडे, सयाजी मोरे, भागवत जाधव, अ‍ॅड. एस.यू. संदे, संदीप राजोबा, शहाजी पाटील, धैर्यशील पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

शेतकर्‍यांचा टनाला 145 रु. तोटा : शेट्टी यांचा आरोप

कराड : प्रतिनिधी

उसाची एफआरपी वाढवताना एफआरपीच्या टक्केवारीच्या सूत्रात सरकारने बदल केला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा प्रतिटन 145 रुपये तोटा होणार आहे. यापूर्वी 9.50 टक्के असे एफआरपीचे सूत्र होते. हे सूत्र बदलून आता 10 टक्के रिकव्हरीचे सूत्र निश्‍चित करून त्यावर 200 रुपयांची वाढीव एफआरपी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे प्रतिटन 289 रुपये शेतकर्‍यांना जादा मिळणार आहेत. मात्र, 9.50 टक्के एफआरपीवरून 10 टक्क्यापर्यंत एफआरपीचे सूत्र बदलण्यात आल्याने अर्धा टक्के रिकव्हरीचा फरक लक्षात घेता प्रतिटन 145 रुपये शेतकर्‍यांचा तोटा होणार आहे. त्यामुळेच शेतकर्‍यांना केवळ 55 रुपयेच प्रतिटन जादा मिळणार असून, शेतकर्‍यांची सरकारने दिशाभूल केली आहे, असा दावाही खा. राजू शेट्टी यांनी यावेळी केला आहे.