Wed, May 22, 2019 15:20होमपेज › Sangli › खा. शेट्टी-जयंत पाटील यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये

खा. शेट्टी-जयंत पाटील यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये

Published On: Apr 25 2018 12:57AM | Last Updated: Apr 24 2018 9:10PMसांगली : प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते,  खासदार राजू शेट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री आ. जयंत पाटील यांनी एकाच गाडीतून केलेल्या प्रवासाचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. हा केवळ योगायोग होता, असे स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव यांनी दिले आहे.

याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, मिरज येथील एका संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी खा. शेट्टी व आ. पाटील एकत्र आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर  शेट्टी तेथून निघून जात होते. यावेळी वाहतुकीस अडथळा असल्याने आ. पाटील हे मोटारसायकलवरून निघाले होते. या वेळी शेट्टी यांची गाडी दिसतात त्यांनी तुमच्यासमवेत प्रवास करणार असल्याचे सांगितले.  प्रवासादरम्यान दोघांत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. याचा कोणीही वेगळा अर्थ काढू नये. सन 2007 मध्येही कोल्हापूर-सांगली महामार्गाबाबत पाटील यांनी खा. शेट्टी यांच्यासमवेत प्रवास करून या मार्गची सविस्तर माहिती घेतली होती. त्यामुळे आताची भेटही निव्वळ योगायोग होता. 

त्यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, स्वाभिमानी शेतकरी संघटना कधीही राजकारण करीत नाही. एखाद्या विधायक कामास संघटनेने कधीही विरोध केला नाही. त्यामुळेच शेट्टी मिरजेतील कार्यक्रमाला उपस्थित  राहिले. राष्ट्रवादी किवा काँग्रेस यांच्याशी आघाडी होईल न होईल.  पण स्वाभिमानी शेतकरी संघटना फक्त  शेतकरी  हितासाठी कटिबद्ध राहिल.

Tags : sangli, MP Raju Shetty Jayant Patil , visit issue, sangli news,