Sat, Jul 20, 2019 02:29होमपेज › Sangli › महाराष्ट्र पोखरला जात असताना साहित्यिक गप्प का?

महाराष्ट्र पोखरला जात असताना साहित्यिक गप्प का?

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 15 2018 12:02AM

बुकमार्क करा
भिलवडी : प्रतिनिधी

महाराष्ट्रात सध्या जे काही घडत आहे, त्याला राजकारणी जबाबदार आहेत. महाराष्ट्राची एकदम बजबजपुरी झाली आहे. सद्य परिस्थिती पाहता महाराष्ट्र आतून पोखरला जात आहे. शेतकरी आत्महत्या करत आहेत. हे सर्व घडत असताना साहित्यिक गप्प का बसले आहेत, असे सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.

औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाच्यावतीने 75 व्या साहित्य संमेलनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे वात्रटीकाकार माजी आमदार रामदास फुटाणे, खासदार संजय पाटील, प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. विश्‍वजीत कदम, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी, माजी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई उपस्थित होते.

संयुक्‍त महाराष्ट्राच्या चळवळीत साहित्यिकांनी मोठे योगदान दिले. अन्यथा मुंबई गुजरातला जोडली गेली असती. आज पुन्हा एकदा महाराष्ट्रासाठी साहित्यिक, कवी यांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे. मी राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्राच्या व मराठीच्या हितासाठी लढत आहे. साहित्यिकांनी पक्ष, राजकारण बाजूला ठेवत महाराष्ट्राच्या हितासाठी माझ्या सोबत यावे. देशात आणीबाणी लागू झाल्यानंतर कराड येथे मराठी साहित्य संमेलनात तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समोर संमेलनाध्यक्ष दुर्गा भागवत यांनी सरकारवर सडकून टिका केली होती. मग आत्ताच गप्प का? असा सवाल करीत जे घडत आहे त्याविषयी बोला, लिहा, असे आवाहन ठाकरे यांनी केले. 

ते पुढे म्हणाले,  तरुण पिढी काम शोधत आहे, मात्र परप्रातियांच्या हाताला रोजगार आहे. महिला सुरक्षित नाहीत. आपण बेसावध राहून चालणार नाही. वेळ गेल्यावर उपयोग होणार नाही. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी सरकार कुचराई करत आहे. अन्य भाषांना अभिजात दर्जा मिळाला पण मराठीला का नाही. 

साहित्यिकांनी पूर्वी लिहलेली पुस्तके वाचा. काय हाल अपेष्टातून महाराष्ट्र गेला आहे हे समजेल. इतिहासातून बोध घेणार नसाल तर साहित्य संमेलने कशासाठी घेता, असा सवालही त्यांनी केला. एक दिवस साहित्य संमेलन घेऊन उपयोग होणार नाही. भांडण तंट्याशिवाय चाललेले पहिलेच साहित्य संमेलन पाहतो आहे. गंमत म्हणून साहित्य संमेलन होणार असेल तर अशी साहित्य संमेलने बंद करा. केरळमध्ये साहित्य संमेलन भरवले जाते. या संमेलनास तेथील सरकारकडून सर्वोतोपरी मदत केली जाते. परदेशातील साहित्य केरळ भाषेत व केरळी भाषेतील साहित्य इतर भाषात रुपांतरीत करण्याचे काम या संमेलनातून केले जाते. परंतु जगाला मराठी साहित्य कळण्याची गरज आहे. यासाठी साहित्यिकांनी साहित्य संमेलनातून समाजाला दिशा देण्याचे काम करणे गरजेचे आहे. मराठी माणसाकडे व भाषेकडे कोण लक्ष देत नाही. साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या हिताची भुमिका वटवली पाहिजे अशी अपेक्षाही ठाकरे यांनी व्यक्‍त केली.

वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांनी आपल्या चारोळीतून सरकारच्या धोरणाविषयी टीका केली. दूध दरवाढ असो अथवा सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय पटकन घेतला जातो. पण शेतकरी हिताची भूमिका घेताना चालढकल केली जाते. अनेक पध्दतीने मागणी करूनही सरकार बधत नाही. 

खासदार संजय पाटील यांनी साहित्य चळवळ रुजवण्याचे आवाहन केले. डॉ. विश्‍वजित कदम म्हणाले, तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात ओढली गेली आहे. सोशल मिडीयामुळे वाचनापासून दुरावत आहे. साहित्य संमेलनांनी वाचन संस्कृती जपण्याची गरज आज निर्माण झाली आहे. 

यावेळी अंकलखोपचे सरपंच अनिल विभुते, उपसरपंच मछिंद्र गडदे, सदानंद साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास कुलकर्णी, उद्योजक काकासाहेब चितळे, गिरीश चितळे, अनिल शिदोरे, पुरषोत्तम जोशी, वासुदेव जोशी, केदार जोशी, शहाजी सूर्यवंशी, सतिश जोशी उपस्थित होते.