Mon, Aug 19, 2019 01:42होमपेज › Sangli › शहर कचर्‍यात; नंबर आलाच कसा? 

शहर कचर्‍यात; नंबर आलाच कसा? 

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 8:46PMसांगली : प्रतिनिधी

शहरात गल्ली-बोळ, उपनगरांमध्ये कचर्‍याचे ढीग पडून आहेत. गटारी तुंबलेल्या आहेत. तरीही  महापालिकेचा स्वच्छ भारत अभियानात नंबर आलाच कसा, असा संतप्त सवाल खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह नेत्यांनी केला. 

दैनिक ‘पुढारी’ ने सोमवारी महापालिकेतील ‘सफाईचा सफाया’ विशेष वृत्ताद्वारे गैरकारभाराचा पर्दाफाश केला होता. त्याची आढावा बैठकीत दखल घेत नेते आणि नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली. 

शहरात जागोजागी कचर्‍याचे ढीग पडून आहेत. अनेक ठिकाणी कंटेनर रस्त्यावरून ओसंडून वाहत आहेत. कचरा कुजल्याने दुर्गंधी पसरली आहे. गटारी तुंबलेल्या आहेत. नालेसफाई होत नाही. पावसाळ्यात काही ठिकाणी तर खुल्या भूखंडांवर कचर्‍याचे ढीग म्हणजे डासांचे अड्डे बनले आहेत. एकीकडे अपुरे कर्मचारी असल्याचे कारण सांगून कचरा उठाव होत नाही. दुसरीकडे बदली कामगारांना काम दिले जात नाही. प्रशासनाच्या अनागोंदी आणि खाबूगिरी कारभाराने सफाईचा बोजवारा उडाला असून, नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. याचा बैठकीत पंचनामा झाला. 

यासंदर्भात आमदार गाडगीळ यांनी थेट आयुक्‍तांना जाब विचारला. ते म्हणाले, राज्यात आपला क्रमांक अव्वल आणि देशात 119 वा आल्याचा टेंभा आपण मिरवत आहोत. पण कचरा पाहिला तर हे सर्व बोगस असल्याचे स्पष्ट होते. या अभियानाला हरताळ फासूनही आपला क्रमांक आलाच कसा?

ते म्हणाले, अभियानापुरती सफाईमोहीम झाली. ज्या रस्त्याने पाहणी पथके फिरली तेवढीच सफाई केल्याचे दिसून येते. रस्ते सुरक्षा सप्ताह आणि सफाई अभियान असले ढोंग कशासाठी? असली अभियानापुरती सफाई काय कामाची? वर्षातील 365 दिवस नागरिकांना रस्ते सुरक्षा, स्वच्छतेसह सर्वच नागरी सुविधा मिळवून देणे आपली जबाबदारी आहे. 

आनंदा देवमाने, माजी नगरसेवक सुरेश आवटींसह अनेक नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतला. देवमाने म्हणाले, आयुक्‍तांनी कचरा उठाव, सफाई यंत्रणेसह सर्व माहितीचा दिलेला आढावा बोगस आहे. आरोग्य अधिकारी त्यांची दिशाभूल करीत आहेत. तीनही शहरात कचर्‍याचे ढीग असताना सफाई अभियानाची खोटी फुशारकी मारायची कशाला? आयुक्‍तांनी कागदोपत्री अहवाल देण्यापेक्षा नेत्यांसह आता पाहणी करावी. वस्तुस्थिती समोर येईल. 

प्रकाश ढंग म्हणाले, तीनही शहरात कंटेनर ओसंडून वाहतात. कचरा उचललाच जात नाही. जे कंटेनर आहेत ते खालून गंजले आहेत. तो कंटेनर उचलून गाडीत ओतायचा झाल्यास संपूर्ण कचरा रस्त्यावर पडतो. त्यामुळे ते कंटेनर दुरुस्त करून घ्यावेत.मात्र ते बदलण्याच्या नावाने नव्याने बाजार नको.

आवटी म्हणाले, मुकादम-कर्मचार्‍यांच्या हातमिळवणीने सफाईचा बोजवारा उडाला आहे. हजेरी लागते पण सफाई होत नाही. कायम कर्मचारी कामावर नाहीत. बदली कामगारांनाही काम दिले जात नाही. मग सफाई होणार कशी? 

जगन्नाथ ठोकळे म्हणाले, संजयनगर-टिंबर एरियामार्गे मीरा हौसिंग सोसायटीकडे येणारा नाला कायम तुंबलेला असतो. पावसाळ्यात दुरवस्था होते. ते सांडपाणी संपूर्ण परिसरात व झोपडपट्टीत पसरते. तो नाला अमृत योजनेंतर्गत बंदिस्त करायचा प्रस्ताव दिला होता. त्याचे काय झाले? 

अनारकली कुरणे म्हणाल्या, महापालिकेने 50 फ्लॅटच्या वरील कचरा उठाव महापालिका करणार नाही, असे आदेश दिले आहेत. पण झोपडपट्टीतील आणि संकुलातील नागरिक कचरा उठावसाठी सारखाच आरोग्य कर देतात. मग कचरा उठावची व्यवस्था आपण करणार नाही म्हटल्यावर जनता आम्हाला जाब विचारते आहे. कचरा व्यवस्थापनात शिस्त जरूर लावावी. पण मागचा कारभार बरा होता असे जनता आता बोलत आहे.सर्वच सदस्यांनी कचरा उठावातीलगोलमाल कारभाराचा समाचार घेतला.  यावेळी आयुक्त खेबूडकर यांनी लवकरच कारभारात सुधारणा झाल्याचे दिसेल असे आश्‍वासन दिले.