Thu, Apr 18, 2019 16:06होमपेज › Sangli › आमदार लाभार्थी प्रकाराने चौथी यादी थांबविली

आमदार लाभार्थी प्रकाराने चौथी यादी थांबविली

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 11:53PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

कर्जमाफी  माहितीच्या घोळात शिवसेनेचे कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार प्रकाश आबिटकर प्रोत्साहन अनुदानाचे लाभार्थी ठरले. त्याचे पडसाद शुक्रवारी विधीमंडळ अधिवेशनात जोरदार उमटले. शासनाने हा प्रकार गांभीर्याने घेतला आहे.  कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र शेतकर्‍यांची चौथ्या टप्प्यातील यादी शासनाने थांबविण्याची सुचना बँकाना दिली आहे. सांगली जिल्हा बँकेला ही सुचना आली आहे. चौथ्या टप्प्यातील यादी शासनाकडून तपासून येणार आहे. त्यानंतर लाभाच्या रकमा शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होतील. 

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान व ओटीएस लाभासाठी आमदार, खासदार अपात्र आहेत.  मात्र आमदार आबिटकर यांचे नाव प्रोत्साहन अनुदानाच्या यादीत आल्याने व त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची 25 हजार रुपये जमा झाल्याने कर्जमाफीच्या माहिती डाटामधील गफलती, त्रुटी, चुका समोर आल्या आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात याचे जोरदार पडसाद उमटले. सरकारी कर्मचारी, शिक्षकही अपात्र आहेत. मात्र त्यांचीही काही नावे कर्जमाफीच्या पात्र यादीत असल्याचे आरोप झाले. 

दरम्यान शासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाच्या चौथी यादीनुसारचे लाभ संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करण्याची कार्यवाही थांबविण्याच्या सुचना बँकांना दिल्या आहेत. तशी सुचना सांगली जिल्हा बँकेलाही आली आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभासाठी पात्र शेतकर्‍यांनी ‘ग्रीन लिस्ट’ बँकेला यादी आल्यानंतर विकास सोसायटीनिहाय यादी तयार केली जाते. ही यादी विकास सोसायट्यांना पाठविली जाते. त्याठिकाणी शहानिशा करून ‘जमा-खर्च’ केला जातो. त्यानंतर बँकेकडून कर्जमाफी/अनुदानाची रक्कम विकास सोसायटीकडे वर्ग होते. त्यानंतर पात्र  लाभार्थी शेतकर्‍याला लाभ दिला जातो. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएस लाभाची चौथ्या टप्प्यातील यादी जिल्हा बँकेला बुधवारी (दि. 13) मिळाली. या यादीत 22 हजार शेतकर्‍यांचा समावेश होता. त्यानंतर गुरूवारी दुरुस्त यादी आली. दुरुस्त यादीत कर्जमाफी व ओटीएसचे 2 हजार 84 शेतकरी वगळले आणि प्रोत्साहन अनुदानाचे 9 हजार 458 शेतकरी वाढले. या चौथ्या टप्प्यातील दुरुस्त यादीनुसार कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचे लाभ देण्याची कार्यवाही सुरू झाली होती. मात्र ‘आमदार आबिटकर लाभार्थी’ प्रकार चव्हाट्यावर आला. विधीमंडळात पडसाद उमटले. शासनाने हा प्रकार गांभिर्याने घेतला आहे. चौथ्या याद्यातील लाभार्थींना लाभ देण्याची कार्यवाही थांबविण्याची सुचना शासनाकडून आली आहे. चौथ्या टप्प्यातील ही यादी शासनस्तरावरून तपासून येणार आहे. कोणाही अपात्र व्यक्तीला कर्जमाफी अथवा प्रोत्साहन अनुदानाचा लाभ होऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे.