Mon, Jun 17, 2019 14:44होमपेज › Sangli › तासगाव : आबांच्या पत्नी बसल्या उपोषणाला

तासगाव : आबांच्या पत्नी बसल्या उपोषणाला 

Published On: May 12 2018 4:52PM | Last Updated: May 12 2018 5:26PMतासगाव : प्रतिनिधी 

मतदार संघातील जनतेला पिण्याचे पाणी मिळावे,  या मागणीसाठी माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या पत्नी आणि आमदार सुमनताई पाटील यांनी तासगाव तालुक्यातील येरळा नदी पात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. 

तालुक्याच्या पश्चिमेकडील भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून गंभीर बनला आहे. लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरफळ कालव्यातून येरळा नदीत पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी आमदार पाटील गेल्या तीन महिन्यापासून करत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे १२ मेला येरळा नदी पात्रात आमरण उपोषण करण्याचा इशारा यापूर्वीच आमदार सुमनताई पाटील यांनी प्रशासनाला दिला होता. यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे उपसा सिंचन व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

परंतु प्रत्यक्षात नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह अत्यंत छोटा असल्याने पाणी पुढे सरकू शकत नव्हते. चार दिवसांपूर्वी आमदार सुमनताई पाटील यांनी नदी पात्राची पाहणी करून पाणी आले आहे किंवा नाही याची खातरजमा केली होती. नदीपात्रात पाणी आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. शनिवार दिनांक १२ पासून आमदार सुमनताई पाटील यांनी नदीपात्रात आमरण उपोषण सुरू केले आहे. उपोषणाला विविध संघटना व संस्था यांनी पाठिंबा दिला आहे. उपोषण स्थळी आमदार सुमनताई यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा उपोषणाला बसले आहेत.