Wed, Mar 20, 2019 08:38होमपेज › Sangli › सात दिवसांत येरळा पात्र भरुन देऊ

सात दिवसांत येरळा पात्र भरुन देऊ

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 11:50PM तासगाव : प्रतिनिधी

ताकारी आणि आरफळ योजनेतून पूर्ण क्षमतेने पाणी सोडून निमणी बंधार्‍यासह तासगाव तालुक्याच्या हद्दीतील येरळा पात्र भरुन देण्याचे आश्‍वासन पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी दिल्यानंतर आमदार सुमनताई पाटील यांनी येरळा नदीपात्रात सुरू केलेले आमरण उपोषण शनिवारी सायंकाळी सोडले.

या उपोषणावेळी उपस्थित असलेले राष्ट्रवादी आणि विरोधी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली. लोकांना पिण्याचे पाणी मिळावे यासाठी आरफळ कालव्यातून येरळा नदीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार पाटील गेल्या तीन महिन्यांपासून करत आहेत. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शनिवारी येरळा नदी पात्रात आमरण उपोषण करण्याचा इशारा आमदार  पाटील यांनी दिला होता. 

यानंतर नदीपात्रात पाणी सोडण्यात आल्याचे उपसा सिंचन व व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले. परंतु प्रत्यक्षात नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्याचा प्रवाह अत्यंत छोटा असल्याने पाणी पुढे सरकू शकत नव्हते. चार दिवसांपूर्वी आमदार पाटील यांनी नदी पात्राची पाहणी करून पाणी आले आहे किंवा नाही याची खातरजमा केली होती. नदीपात्रात पाणी आले नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावर संताप व्यक्‍त करुन अखेर शनिवारी दुपारी दोन वाजता आमदार पाटील यांनी नदीपात्रात उपोषण सुरू केलेे. उपोषणाला विविध संघटना व संस्था यांनी पाठिंबा दिला होता. 

दरम्यान, सायंकाळी पाचच्या सुमारास निवासी नायब तहसीलदार सुनील ढाले, सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले उपोषणस्थळी दाखल झाले. त्यांनी उपोषण पाठीमागे घेण्याची विनंती केली. परंतु पाटबंधारे विभागाचे कोणतेही अधिकारी उपस्थित नसल्याने कार्यकर्ते व आमदार पाटील यांनी उपोषण मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला.

सायंकाळी सात वाजता टेंभू उपसा सिंचन योजनेचे कार्यकारी अभियंता आर. वाय. रेड्डीयार यांनी उपोषणस्थळी भेट देऊन लवकरात लवकर येरळापात्रात पाणी सोडू, असे आश्‍वासन दिले. उपोषण पाठीमागे घेण्याची विनंती केली. मात्र कार्यकर्ते ऐकण्याची मनस्थितीत  नव्हते. अखेर अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले येरळा पात्रात आले. सात दिवसांच्या आत तालुक्याच्या हद्दीतील येरळा पात्र आणि निमणी बंधारा भरुन देण्याची ग्वाही त्यांनी दिली. यानंतर आमदार पाटील यांनी उपोषण मागे घेतले.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश पाटील, रोहित पाटील, जिल्हा युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष भरत देशमुख, बाजार समितीचे सभापती रवी पाटील, माजी सभापती अविनाश पाटील, जि. प. सदस्य संजय पाटील, सतीश पवार, चंद्रकांत पाटील, अर्जुन माने, ताजुद्दीन तांबोळी, खंडू पवार, पंचायत समितीच्या सभापती बेबीताई माळी, माजी सभापती संजय पाटील, युवती जिल्हाध्यक्ष वर्षाताई वाघमारे, विश्‍वास पाटील, प्रमोद पाटील, अमोल शिंदे, आर. डी. पाटील, युवराज पाटील,  बाळासाहेब पवार, शरद शेळके उपस्थित होते.