Wed, Nov 14, 2018 06:19होमपेज › Sangli › एलबीटी वसुली; कार्यवाही थांबवा

एलबीटी वसुली; कार्यवाही थांबवा

Published On: Dec 19 2017 2:05AM | Last Updated: Dec 18 2017 11:20PM

बुकमार्क करा

सांगली प्रतिनिधी 

सांगलीसह राज्यातील सर्वच महापालिकांतर्फे सुरू असलेली एलबीटीची सक्‍तीची वसुली आणि कार्यवाही थांबवावी, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगरविकास विभागाला  दिले आहेत. ही माहिती आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली.

सांगलीत महापालिकेमार्फत सुरू असलेल्या असेसमेंट आणि कार्यवाहीसंदर्भात व्यापार्‍यांच्या तक्रारी होत्या. त्याबाबत विधीमंडळ अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित केला. त्यानुसार हा निर्णय झाल्याचे ते म्हणाले.

गाडगीळ म्हणाले, एलबीटी हटविल्यानंतरही थकबाकी वसुलीसाठी सांगली, मिरजेत कर निर्धारण करून थकबाकीच्या रकमा काढण्याचे काम सुरू आहे. यासाठी महापालिकेने खासगी सीए पॅनेल नेमले. त्यांना कोट्यवधी रुपये मानधन देण्याचा महासभेने ठराव केला आहे. या पॅनेलने कमिशनपोटी ज्यांचा एलबीटीच्या कक्षेत समावेश नाही, अशा व्यापार्‍यांच्याही चुकीच्या असेसमेंट सुरू ठेवल्या आहेत. त्यातून नोटिसा  आणि धमकीसत्र व जबरदस्तीची वसुली सुरू आहे.

ते म्हणाले, याबाबत एलबीटी हटाव कृती समिती व व्यापारी एकता असोसिएशनने तक्रारी केल्या होत्या. असेसमेंट रद्द करून कारवाईस स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. अधिवेशनात नगरविकास विभागाच्या चर्चेत सभागृहात प्रश्‍न उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन तोडगा काढण्याची मागणी केली. त्यांनी तत्काळ स्थगितीचा  निर्णय घेतला. यावेळी कोल्हापूरचे भाजपचे आमदार अमल महाडिक उपस्थित होते.