Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Sangli › कितीहीजण या; मैदान मीच मारणार

कितीहीजण या; मैदान मीच मारणार

Published On: Apr 06 2018 1:28AM | Last Updated: Apr 05 2018 8:00PMशिराळा : प्रतिनिधी

मी आता घट्ट लांग घातली आहे. ती बदलत नाही. तुम्ही कितीही आणि कसेही या. मैदान मीच मारणार आहे, असा टोला आमदार शिवाजीराव नाईक यांनी विरोधकांचे नाव न घेता लगावला.येथे भाजप स्थापनादिन नियोजनाच्या निमित्ताने  आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. रणधीर नाईक, उदयसिंह नाईक, सुखदेव पाटील, सी. एच. पाटील प्रमुख उपस्थित होते.

आमदार नाईक म्हणाले, विरोधकांना दोनवेळा चितपट केल्याने आता त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मते मिळविण्यासाठी ते आता कसलाही प्रचार करीत आहेत. काहीजण पक्षनिष्ठा सांगत आहेत. त्यांनी 2009 च्या निवडणुकीत काय केले? कुणी कुणाचा प्रचार केला ते लोकांना माहीत नाही का? ते म्हणाले, जे आम्ही पक्ष बदलणार म्हणून प्रचार करत आहेत. ते शाहुवाडीत शिवसेनेबरोबर तर शिराळ्यात काँग्रेसबरोबर असतात हे ते विसरतात काय? त्यांची हिम्मत असती तर ते एकटे लढले असते.

आमदार नाईक म्हणाले,  अपघाताने मिळालेल्या आमदारकीच्या काळात  पाच वर्षांत एकदाही सभागृहात बोलले नाहीत. ते आता शिराळ्यात सांगतात, की मी पाच वर्षात गटारी केल्या, काँक्रीटीकरण केले. यांनी मतदारसंघाच्या दृष्टीने एकही महत्वाचे काम केले नाही. जी कामे आम्ही केली त्याचे श्रेय घेण्यासाठी शासकीय पातळीवर पत्रिका काढण्यापूर्वीच उद्घाटने ते करीत आहेत. रणधीर नाईक म्हणाले,  विरोधकांच्या पक्षाला जनतेने ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत झिडकारले आहे. त्यांना टीका-टिप्पणीशिवाय दुसरे काम नाही. त्यातच वर्षभरात होणार्‍या निवडणुकीत जनतेला सांगण्यासारखा एकही विषय राहिलेला नाही. त्यामुळे  चर्चेत राहण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. भाजपचे बूथ विस्तारक पार्थ शेटे, भीमराव गराडे,  सी. एच. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. दत्ता पाटील, एस. के. पाटील, आनंदराव पाटील, संपतराव मुळीक उपस्थित होते. सुखदेव पाटील यांनी स्वागत केले. रफीक आत्तार यांनी आभार मानले. 

Tags :  MLA, Shivajirao naik, says, going, win,next, year, election