सांगली : प्रतिनिधी
दिल्ली येथील जंतरमंतरवर संविधान जाळणार्यांना अद्याप अटक झालेली नाही. त्यांना तातडीने अटक करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पिपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार बैठकीत केले. तसेच दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी व गौरी लंकेश हत्येतील मुख्य सूत्रधारांचा तातडीने शोध घ्यावा, अशीही मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले, दिल्लीमध्ये पोलिसांच्या उपस्थितीत घटना जाळण्यात आली व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक शब्द वापरण्यात आले. त्यांच्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. घटना जाळणार्यांच्या विचाराचेच सरकार सध्या सत्तेवर आहे.
मनुस्मृती समर्थन, आरक्षणाला विरोध हे घटनेला विरोध करणार्यांचेच काम आहे. घटनेने सर्व समाजाला आरक्षण दिलेले असताना मराठा समाज, धनगर समाज अद्याप आरक्षणापासून वंचित आहे. त्यांना तातडीने आरक्षण दिले पाहिजे. महाराष्ट्रात शेतकर्यांचे प्रश्न गंभीर बनत आहेत. सरकारने कर्जमाफी केली नाही. त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ते अद्याप केलेेले नाही. सर्व घटकांकडून सरकारला विरोध होत असतानाही केवळ ईव्हीएममध्ये फेरफार करून हे सरकार सत्तेवर येत आहे. यासंबंधी आम्ही सातत्याने आवाज उठविला आहे.
एटीएसने वैभव राऊत याच्या घरावर छापा टाकून त्याच्याकडे शस्त्रास्त्रे जप्त केली आहेत. घातपाताच्या कारवाया घडविण्याचा त्यांचा कट होता. तो एटीएसने हाणून पाडला आहे. राऊत हा आतंकवादी असताना त्याच्या समर्थनार्थ मोर्चे काढले जातात. हे एकप्रकारे आतंकवादी कृत्याचेच समर्थन आहे. त्यांच्या सूत्रधारापर्यंत पोहचून कारवाई करावी.