Thu, Jul 18, 2019 02:32होमपेज › Sangli › सरकारविरोधात आता वर्षभर हल्लाबोल

सरकारविरोधात आता वर्षभर हल्लाबोल

Published On: Mar 04 2018 1:40AM | Last Updated: Mar 03 2018 11:09PMसांगली : प्रतिनिधी

राज्य सरकारच्या फसव्या घोषणांविरोधात आता वर्षभर ‘हल्लाबोल’ करा.  सरकारच्या चुकांवर बोट ठेवून रस्त्यावर उतरा. जनतेच्या समस्यांना वाटा फोडा, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी केले. दरम्यान, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी (ग्रामीण) विलासराव शिंदे यांची सलग सातव्यांदा बिनविरोध निवड झाली. 

राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयात  शनिवारी जिल्हाध्यक्ष, जिल्हा व प्रदेश कार्यकारिणी निवडीसाठी बैठक झाली.  प्रदेश निरीक्षक प्रकाश मस्के, आमदार जयंत पाटील, आमदार सुमनताई पाटील, क्रांती कारखान्याचे अध्यक्ष अरूणअण्णा लाड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छायाताई पाटील,  जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादीचे गटनेते शरद लाड, अविनाश पाटील, अर्जुन पाटील, इलियास नायकवडी, भीमराव पाटील, बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे ताजुद्दीन तांबोळी, बाळासाहेब होनमोरे, हणमंत देशमुख, गणेश पाटील, रमेश पोलेशी पाटील,  अल्लाउद्दीन चौगुले, पी. आर. पाटील, मनोज भिसे व कार्यकर्ते उपस्थित होते. 

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष शंकरदादा पाटील यांनी पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदासाठी विलासराव शिंदे यांचे नाव सुचविले. आमदार जयंत पाटील यांच्यासह सर्व तालुकाध्यक्षांनी अनुमोदन दिले. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून (जून 1999) शिंदे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आहेत. 

जयंत पाटील म्हणाले, जिल्ह्यात अधिक वेगाने राष्ट्रवादीची मजबूत बांधणी करायची आहे. जत, आटपाडी, खानापूर, पलूस, कडेगाव तालुक्यात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे.

4 व 5 एप्रिलला हल्लाबोल सभा

जयंत पाटील म्हणाले, सरकारच्या फसव्या घोषणांविरोधात जिल्ह्यात दि. 4 व 5 एप्रिलला हल्लाबोल आंदोलन व सभा होणार आहेत. दि. 4 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता आटपाडी, दुपारी 2 वाजता जत, 5 वाजता मिरज आणि सायंकाळी 7 वाजता सांगलीत स्टेशन चौकात हल्लाबोल सभा होणार आहे. दि. 5 एप्रिल रोजी तासगाव, शिराळा, इस्लामपूर, पलूस येथे हल्लाबोल सभा होतील. दरम्यान, ‘शेतकर्‍यांच्या दारात राष्ट्रवादीचा शिलेदार’, हा उपक्रम राबविल्याबद्दल बाळासाहेब होनमोरे यांचे जयंत पाटील यांनी कौतुक केले.