Sun, Aug 25, 2019 19:47होमपेज › Sangli › भाजपच्या बॅगांपेक्षा आघाडीच्या झोळीत जास्त मते पडणार

भाजपच्या बॅगांपेक्षा आघाडीच्या झोळीत जास्त मते पडणार

Published On: Jul 15 2018 1:30AM | Last Updated: Jul 15 2018 12:08AMसांगली : प्रतिनिधी

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडे बॅगा नाहीत. मतांचा जोगवा मागायला झोळी आहे. भाजपच्या भेटवस्तूंच्या बॅगांपेक्षा आघाडीच्या झोळीतच जास्त मते पडतील, असा ठाम विश्‍वास राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार बैठकीत व्यक्त केला. 

काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये कुणीच गेले नाहीत. त्यामुळे तो पक्ष भाजप कुपोषणग्रस्त झाला आहे, अशी टीकाही पाटील यांनी केली. पाटील म्हणाले,  महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला सत्तेवर आणण्याचा मतदारांचा सूर आहे. आघाडीने महापालिका क्षेत्राच्या विकासावर विशेष फोकस केला आहे. आघाडीचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध होईल. आघाडी सत्तेवर आल्यानंतर या जाहीरनाम्याची अंमलबजावणी करण्याचे जबाबदारी मी  आणि  जयश्री पाटील यांनी घेतली आहे. 

अपक्षांची समजूत घालू

खासदार राजू शेट्टी यांनी अपक्षांची मोट बांधणे सुरू केली आहे,याकडे लक्ष वेधल्यावर  आमदार पाटील म्हणाले, अपक्षांची समजूत घालणे सुरू आहे. धर्मनिरपेक्ष विचारांत फूट होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे. त्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने सामंजस्याची भूमिका घेतली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वांना सामावून घेतले जाईल. भाजपचा पाडाव करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू.  पाटील म्हणाले,  महापालिका क्षेत्रातील काँग्रेस, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या प्रलोभनाला बळी पडले नाहीत. मतदारही भेटवस्तूंच्या प्रलोभनाला बळी पडणार नाहीत. 

सांगलीचा शहराप्रमाणे विकास न होता ते अजून खेडेगावच राहिले असल्याच्या भाजपच्या टीकेचा जयंत पाटील यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, केंद्रात, राज्यात भाजपची सत्ता येऊन चार वर्षे झाली आहेत. सांगलीचे शहर करण्यास त्यांना कुणी अडवले होते? ना. चंद्रकांत पाटील हे सांगलीचे पालकमंत्रीही होते. त्यांनी सांगलीच्या विकासासाठी किती योगदान दिले. सांगलीत दोन-चार रस्ते करण्यापलिकडे भाजपने काहीच काम केले नाही. 

चंद्रकांतदादांचे कौतुक वाटते!

महापालिका क्षेत्रातील जनतेला भेटवस्तू देऊन जिंकू शकतो हा विश्‍वास ना. चंद्रकांत पाटील यांच्यामध्ये वारंवार दिसत आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक करावे वाटते, असा उपरोधिक टोला  पाटील यांनी लगावला. ते म्हणाले, सांगली ही वसंतदादांची आहे. छोट्या-मोठ्या भेटवस्तूंना बळी पडणारी  इथली जनता नाही. धर्मनिरपेक्ष विचारांना साथ देणारी जनता इथे आहे. केंद्र व राज्य  शासनातील भाजपकडून सर्वच समाजघटकांची घोर निराशा झालेली आहे. त्यामुळे ही जनता महापालिकेत भाजपचा शिरकाव होऊ देणार नाहीे. 

महाआघाडीच्या सत्ताकाळात शेवटच्या दीड वषार्ंत ज्या राजकीय बाबी घडल्या, त्या दुरुस्त केल्या आहेत. इद्रिस नायकवडी व आम्ही एकत्र आलो आहोत, असेही पाटील यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.