Thu, Jun 27, 2019 18:14होमपेज › Sangli › यशापयशापेक्षा स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा

यशापयशापेक्षा स्पर्धेतील सहभाग महत्त्वाचा

Published On: Dec 29 2017 1:31AM | Last Updated: Dec 28 2017 8:12PM

बुकमार्क करा
आष्टा : प्रतिनिधी

स्पर्धेतील यश - अपयश यापेक्षा देशाच्या कानाकोपर्‍यातील सर्व खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मान मिळाला, ही अत्यंत महत्वाची बाब असून आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाची ही सुरूवात आहे. या स्पर्धेतून प्रेरणा घेऊन खेळाडूंनी आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे प्रतिपादन माजी ग्रामविकास मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.

येथील अण्णासाहेब डांगे शैक्षणिक संकुलात आयोजित करण्यात आलेल्या 63 व्या राष्ट्रीय शालेय खो - खो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. संत ज्ञानेश्‍वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार विलासराव शिंदे यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डांगे म्हणाले, विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा क्षेत्रालाही महत्व दिले पाहिजे.देशाच्या विविध राज्यांतून आलेल्या खेळाडूंनी खिलाडूवृत्तीने या स्पर्धा यशस्वी कराव्यात. या राष्ट्रीय 
स्पर्धेच्या आयोजनाची संधी संस्थेला मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

प्रारंभी आमदार जयंत पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार विलासराव शिंदे, वाळवा पंचायत समितीचे सभापती सचिन हुलवान, इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष विजय पाटील यांच्या हस्ते प्रतिमापूजन व ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी देशातील 27 राज्यांतून आलेल्या खेळाडू  मुला - मुलींनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली. पंच, व्यवस्थापक व मार्गदर्शकासह पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी खेळाडूंना शपथ देण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दुबई येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत यश प्राप्त केलेल्या अण्णासाहेब डांगे पब्लिक स्कूलच्या अभिजित सावंत, गौरव शेंडे, आनंद गाडे, प्रथमेश काटे, ओंकार सकट तसेच अण्णासाहेब डांगे आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या हातोडाफेक मध्ये राज्यात प्रथम आलेल्या स्वप्नील पाटील व करण बोते या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब डांगे कला अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

स्पर्धेच्या ठिकाणी विद्युतझोतातील चार क्रीडांगणासह सुसज्ज प्रेक्षक गॅलरीची व्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी संस्थेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. संपतराव पाटील, कार्यकारी संचालक प्रा. आर. ए. कनाई, सचिव अ‍ॅड.चिमण डांगे, अण्णासाहेब डांगे शिक्षण संकुलातील विविध शाखांचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक तसेच जिल्ह्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.