Sun, Mar 24, 2019 10:34होमपेज › Sangli › पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना धमकीपत्रांची स्टंटबाजी

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना धमकीपत्रांची स्टंटबाजी

Published On: Jun 12 2018 12:53AM | Last Updated: Jun 12 2018 12:23AMसांगली : प्रतिनिधी

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांना धमकीपत्रे आल्याचे खुलेआम जाहीर करून भाजपकडून राजकीय स्टंटबाजी सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी येथे पत्रकार बैठकीत केला. 

आरपीआयचे नेते प्रकाश आंबेडकर आणि एल्गार परिषदेच्या कार्यकर्त्यांचा नक्षली चळवळीशी संबंध जोडण्याचा प्रकार गंभीर आहे. यातून दलित चळवळीत फूट पाडण्याचे षङ्यंत्र आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

ते म्हणाले, पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांसारख्या महत्त्वपूर्ण व्यक्‍तींना धमकीपत्रे येतात, ही गंभीर बाब आहे. पण त्याची संबंधित इंटेलिजन्स संस्थांसह चौकशी करणार्‍या गोपनीय पोलिस यंत्रणा आहेत. त्यांच्याकडून कसून चौकशी झाली पाहिजे. त्याच्या मुळाशी जाऊन त्यात तथ्य असेल तर त्यांच्यावर कारवाई करणे आवश्यक आहे. अर्थात ही सर्व प्रक्रिया सरकार आणि संबंधित यंत्रणांनी गोपनीय पद्धतीने करायला हवी. पण प्रसारमाध्यमांसमोर त्याची जाहीर वाच्यता करून भाजपला यात काय साध्य करायचे आहे? त्यांचा यामागे हेतू काय? याबाबत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांनी टीका केली तर त्यावर मुख्यमंत्री त्याला वेगळीच दिशा देत आहेत हा त्याचाच भाग आहे.

आमदार पाटील म्हणाले, भीमा-कोरेगाव प्रकरणात सहभागी असणार्‍यांचा तपास खोलवर झाला नाहीच. उलट आता एल्गार परिषदेतील दलित कार्यकर्त्यांवर सरकारच्या दबावाने पोलिस कारवाई करीत आहेत. एवढ्यावर न थांबता त्यांचा नक्षली चळवळीशी संबंध जोडला जात आहे. आता तर अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावरही नक्षली चळवळीचा ठपका ठेवून कारवाईची दिशा सुरू झाली आहे. भाजपकडून हे सर्व दलित चळवळीत फूट पाडण्याचे षङ्यंत्र आहे. 

राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल विचारता पाटील म्हणाले, ते पक्षातील ज्येष्ठ नेते आहेत. ते पक्षात सक्रिय होते आणि पुढेही राहणार आहेत. त्यांच्याकडे कोणती जबाबदारी देण्याची गरजच काय?