Sat, Apr 20, 2019 18:08होमपेज › Sangli › एकदिलाने काम करून मनपात सत्ता मिळवू

एकदिलाने काम करून मनपात सत्ता मिळवू

Published On: Jun 04 2018 1:07AM | Last Updated: Jun 03 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

डॉ. पतंगराव कदम यांनी केलेल्या कामाच्या पुण्याईवरच बिनविरोध आमदार होता आले. महापालिकेच्या मागील निवडणुकीत त्यांनी विशेष योगदान दिले होते. राज्यात सत्ता नसतानाही सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील नगरसेवकांनी विकासकामे केली आहेत. विकासकामांच्या बळावर काँग्रेसमधील सर्व नेते एकदिलाने काम करून महापालिकेत काँग्रेसला सत्ता मिळवू, असा विश्‍वास आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी व्यक्त केला. 

सांगली शहर-जिल्हा काँग्रेसतर्फे आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. ते म्हणाले, पलूस-कडेगाव मतदारसंघाची पोटनिवडणूक लढवत असताना एक अदृश्य शक्ती पाठीशी असल्याचे जाणवत 
होते. 

डॉ.  पतंगराव कदम यांनी केलेल्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक सेवेची पुण्याईच या निवडणुकीत माझ्या पाठीशी उभी राहिली. त्यामुळेच राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध आमदार बनणे शक्य झाले. महापालिकेची मागची निवडणूक जवळून पाहिली आहे. त्यामुळे या निवडणुकीचा अनुभव आहे. 

मदनभाऊ, डॉ. कदम यांच्या निधनामुळे आताच्या काँग्रेसच्या नेत्यांवरील नैतिक जबाबदारी वाढली आहे. सरकारने सांगलीच्याबाबतीत दुजाभाव करूनही काँग्रेसच्या नगरसेवकांनी विकासकामे केली आहेत. पक्षातील सर्व नेते महापालिकेसह सर्वच निवडणुकांत एकदिलाने काम करतील. कार्यकर्त्यांना ते पोरके झाल्याची भावना निर्माण होऊ देणार नाही, असेही कदम यावेळी म्हणाले. 

माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनाने जी पोकळी निर्माण झाली आहे ती भरून काढण्याची अपेक्षा विश्‍वजित कदम यांच्याकडून कार्यकर्त्यांची आहे. ते कार्यकर्त्यांना वेळ देतील. काँग्रेस पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचे दिसून येईल. काँग्रेस हाच केवळ एक गट असेल. कार्यकर्त्यांनी विनाकारण फलकांवर नेत्यांच्या फोटोवरून त्यांच्यात भांडणे लावू नयेत, अशा कानपिचक्याही त्यांनी यावेळी दिल्या.    प्रास्ताविक शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. 

यावेळी आमदार विश्‍वजित कदम यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी महापौर हारूण शिकलगार, शैलजा पाटील, जयश्री पाटील, स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते, मालन मोहिते, करीम मेस्त्री, नगरसेवक राजेश नाईक, सिद्धार्थ जाधव, प्रतीक्षा सोनवणे, वहिदा नायकवडी, अनारकली कुरणे यांच्यासह आजी, माजी नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. पैगंबर शेख यांनी आभार मानले.