होमपेज › Sangli › पैसे न दिल्याने वार करून रोकड लुटली 

पैसे न दिल्याने वार करून रोकड लुटली 

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 27 2018 10:26PMसांगली : प्रतिनिधी

शहरातील वडर गल्लीत मोटारसायकलवरून जाणार्‍या दोघांना अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी करण्यात आली. ते न दिल्याने एकाच्या डोक्यात विट घालून त्याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आला. त्यानंतर जखमीच्या मित्राकडील चार हजार शंभर रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेण्यात आली. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मेहबूब, मुतक्या (पूर्ण नावे नाहीत) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकऱणी तुकाराम सुभाष मोटे (वय 24, रा. संजयनगर) याने फिर्याद दिली आहे. यामध्ये तुकाराम गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास तुकाराम आणि त्याचा मित्र कुमार रूपनर वडर गल्लीत घोडा पाहण्यासाठी मोटारसायकलवरून निघाले होते. वडर गल्लीच्या कोपर्‍यावर गेल्यावर दोघा संशयितांनी त्यांना अडविले. 

त्यानंतर दोघांनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. मात्र तुकारामने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी त्याच्या डोक्यात विट घातली. त्यानंतर धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केला. त्यानंतर कुमार रूपनर याला धमकावत त्याच्याकडील चार हजार शंभर रूपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली. जखमी तुकारामवर सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी रविवारी दोघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.