Tue, Jun 18, 2019 23:15होमपेज › Sangli › लोढे तलावामुळे शेतकर्‍यांची दुष्काळावर मात

लोढे तलावामुळे शेतकर्‍यांची दुष्काळावर मात

Published On: Aug 03 2018 1:38AM | Last Updated: Aug 02 2018 11:28PMमांजर्डे : विलास साळुंखे

लोढे (ता. तासगाव) येथील पाझर तलाव शेतकर्‍यांसाठी वरदान  ठरत आहे. या तलावातील पाण्यामुळे शेतकर्‍यांना दुष्काळावर मात करणे शक्य होत आहे. यामुळे  भागात उसासह द्राक्षक्षेत्रात  वाढ झाली आहे.  

शेतकर्‍यांच्या एकीच्या बळावर तलावात उन्हाळ्यातसुद्धा पाणी  राहिले आहे. आरवडे, कौलगे, डोर्ली, लोढे, सावर्डे, चिंचणी या भागांतील शेतकर्‍यांना या तलावातील पाण्याचा  लाभ होतो. मागील काही वर्षांत या तलावात आवश्यक पाणीच साठले नव्हते.  त्यावेळी या तलावातील पाण्यावर शेतकर्‍यांनी द्राक्ष, ऊस, भाजीपाला आदी पिके घेतली होती. परंतु तलावात पाणीच नसल्यामुळे या भागातील शेतकर्‍यांना फटका बसला. 

तत्कालीन  मंत्री  आर. आर. पाटील यांनी या भागातील दुष्काळी परिस्थिती कायमची संपविण्यासाठी   विसापूर-पुणदी उपसा सिंचन योजना  कार्यान्वित केली.  आबा असताना या योजनांचे पाणी लोढे तलावात सोडण्यात आले होते. मात्र आबांचे जाणे, तसेच नंतरचे सत्तांतर यामुळे या योजना चालणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागत होते. त्यावेळी केवळ  ‘टंचाई’ तरतुदीमधूनच पाणी सोडण्यात येत होते. तर प्रशासनाकडे पाण्याची मागणी केली की अगोदर पाणीपट्टी भरा तरच पाणी, अशी भूमिका पाटबंधारे विभाग घेत होते.

अर्ज, विनंती करून, आंदोलने करून शेतीला पाणी मिळत  नसल्यामुळे  सर्वानुमते लोढे तलाव भरून घेण्यासाठी पाणीपट्टी भरण्यावर एकमत झाले. सर्वच गावांचे सरपंच, उपसरपंच, पदाधिकार्‍यांनी देखील समन्वय साधत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.