होमपेज › Sangli › जत तालुक्यात पशुधन वार्‍यावर

जत तालुक्यात पशुधन वार्‍यावर

Published On: Jul 10 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 7:14PMमाडग्याळ : वार्ताहर

जत तालुक्यातील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी - 1 मध्ये अनेक पदे रिक्त आहेत. वेळेवर पशुवैद्यकीय सेवा मिळत नसल्यामुळे पशुधनाचे आरोग्य धोक्यात आले आहे. या सार्‍यामुळे पशुधन अक्षरश: वार्‍यावर सोडले गेले आहे. संबंधित विभागाने ही रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.जत तालुक्यात तेवीस पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. त्यापैकी श्रेणी - 1 चे 14 ठिकाणी दवाखाने आहेत. श्रेणी - 2 चे 9 ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. मात्र श्रेणी- 1 मधील 14 दवाखान्यांपैकी चार ठिकाणीच डॉक्टर आहेत. उर्वरित दहा  दवाखान्यात रिक्‍त पदे आहेत.

तालुक्यातील माडग्याळ, वज्रवाड, बाज, उमदी या ठिकाणीच पशुवैद्यकीय दवाखान्यात डॉक्टर आहेत. जत, सोन्याळ, संख, औंढी,  येळवी, कुंभारी, उमराणी, दरीबडची, सनमडी, बोर्गी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यांतही रिक्‍त पदे आहेत. त्या ठिकाणी सध्या प्रभारी डॉक्टर कामकाज पहात आहेत. ज्या ठिकाणी डॉक्टरची नेमणूक केलेली आहे. तेथे अनेक वेळा डॉक्टर वेळेवर येत नसल्याचे चित्र आहे.जत तालुका हा विस्ताराने मोठा आहे. हा भाग दुष्काळी आहे. संकरीत गायी, देशी गायी, मेंढ्या, कोंबड्या अशी एकूण 559101 पशुधन संख्या तालुक्यात आहे. परंतु या सर्वांवर उपचार करण्यासाठी पुरेसे डॉक्टर नसल्यामुळे जनावरांना उपचार मिळणे कठीण झाले आहे. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळत नसल्यामुळे येथे पशुपालकांचे नुकसान होत आहे.जत तालुका विस्ताराने मोठा आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतीबरोबर जोडधंदा  म्हणून जनावरे पाळतो. हवामान  बदलामुळे अनेक रोग जनावरांना होत आहेत. त्यावेळी पशुवैद्यकीय दवाखान्यांत डॉक्टर नसल्यामुळे खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जावे लागते. ते जादा फी आकारतात. त्याचा फटका बसतो आहे.