होमपेज › Sangli › लिंगायत विद्यार्थ्यांना फी सवलत, ओबीसी दाखले तत्काळ मिळावेत

लिंगायत विद्यार्थ्यांना फी सवलत, ओबीसी दाखले तत्काळ मिळावेत

Published On: Jun 16 2018 1:31AM | Last Updated: Jun 15 2018 8:36PMसांगली : प्रतिनिधी

लिंगायत विद्यार्थ्यांना फीमध्ये 50 टक्के सवलत आणि पोटजातींना सरसकट तत्काळ ओबीसी दाखले मिळाले पाहिजेत. यासंदर्भात लिंगायत महामोर्चा समन्वय समिती पुन्हा लढा उभारणार असल्याचे समन्वयक शिक्षकनेते विश्‍वनाथ मिरजकर, प्रदीप वाले यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत मंगळवारी बैठक होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मिरजकर म्हणाले, लिंगायत स्वतंत्र धर्ममान्यता, सर्व पोटजातींना आरक्षण आदींसह विविध मागण्यांसाठी सर्व राज्यांत एल्गार सुरू आहे.  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यासह अनेकांनी यासंदर्भात बाजू मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या निर्णयासाठी सकारात्मक आहेत. ते म्हणाले, मराठा समाजाला शैक्षणिक फीमध्ये 50 टक्के सवलतीचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याबद्दल सरकारचे अभिनंदन आहे. सोबतच आता लिंगायत समाजातील सर्व पोटजातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक लाभासाठी 50 टक्के फीमध्ये सवलत व ओबीसीचे दाखले तत्काळ द्यावेत. सरकारने याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा पावसाळी अधिवेशनात ताकदीने पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल.

प्रदीप वाले म्हणाले, अनेक पोटजातींना आरक्षण आहे. परंतु लिंगायत उल्लेख असल्याने अनेक ठिकाणी ओबीसी आरक्षण मिळत नाही. दाखल्यांवर याबाबत दुरुस्तीसाठी मागासवर्गीय आयोगासमवेत बैठकही झाली आहे. मुंबईत फडणवीस, पाटील आदींनी त्यासाठी सूचनाही केल्या आहेत. परंतु अद्याप अंमलबजावणी नाही. यासंदर्भात मंगळवारी भेटून आयोगासमवेत बैठक घेणार आहोत. यावेळी प्रा. शिवपुत्र आरबोळे, राजेंद्र कुंभार, ईश्‍वराप्पा सबरद, प्रा. राजाराम  पाटील, सुभाष चौगुले, शशिकांत फल्ले, राजू पटील उपस्थित होते.