Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Sangli › लिंगायत धर्ममान्यतेसाठी मंत्रालयावर धडक

लिंगायत धर्ममान्यतेसाठी मंत्रालयावर धडक

Published On: Dec 28 2017 1:28AM | Last Updated: Dec 27 2017 10:12PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यतेसह विविध मागण्यांसाठी आता मुंबईत मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीने महामोर्चा धडकणार आहे. येत्या उन्हाळी अधिवेशनात निघणार्‍या मोर्चासाठी आता व्यूहरचना सुरू झाल्याचे  लिंगायत महामोर्चा समन्वय समितीचे निमंत्रक विश्‍वनाथ मिरजकर, प्रदीप वाले यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. यासाठीची रॅली महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशमधून 2500 हजार किलोमीटर प्रवास करून मुंबईत धडकणार असल्याचे ते म्हणाले.

मिरजकर म्हणाले, लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता, अल्पसंख्याक दर्जा, आरक्षण मिळावे या मागणीसाठी देशात लिंगायत समाजाचा एल्गार सुरू आहे. सर्वत्र समाज बांधवांचे लाखोंचे मोर्चे निघत आहेत. 3 डिसेंबरला सांगलीतही रेकॉर्डब्रेक मोर्चा झाला.  कर्नाटकात राज्य सरकारने लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता व अल्पसंख्याकांचा दर्जा देण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस केली आहे. तशी शिफारस महाराष्ट्र सरकारनेही करणे आवश्यक आहे. यासाठी येत्या उन्हाळी अधिवेशनादरम्यान मुंबईत मंत्रालयावर मोटारसायकल रॅलीच्या माध्यमातून धडक देण्यात येणार आहे.

वाले म्हणाले, महाराष्ट्र, कर्नाटक  व आंध्रमधील काही भागातून मोटारसायकल रॅलीद्वारे हा महामोर्चा निघेल. एकूण दहा दिवस 2500 किलोमीटरचा प्रवास करत रॅलीरूपी महामोर्चा मंत्रालयावर पोहोचणार आहे. रॅलीची सुरवात सांगलीतून होणार आहे. 

ते म्हणाले, मुंबईत ही संख्या लाखांच्या घरात जाईल. रॅलीमध्ये बसवेश्‍वरमूर्ती असलेला रथ असणार आहे. सांगली, कवठेमहांकाळ, जत, विजापूर, कुडलसंगम, उदगिरी, नांदेड, अहमदपूर, लातूर, तुळजापूर, सोलापूर, बार्शी, बीड, नगर, पुणे, नाशिक, कल्याण, ठाणे मार्गे रॅली मुंबईत पोहोचेल. मोर्चा समन्वय समितीचा मेळावा झाला. यात योगदान देणार्‍यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मिलिंद साखरपे, सचिन गाडवे उपस्थित होते.