Mon, Apr 22, 2019 12:06होमपेज › Sangli › लिंगायत समाजाचा महामोर्चा

लिंगायत समाजाचा महामोर्चा

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 12:06AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

सांगलीत रविवारी पश्‍चिम महाराष्ट्रातील लाखोंच्या संख्येने लिंगायत महामोर्चाचे वादळ उठले. धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जा आणि पोटजातींना आरक्षण या मागणीसाठी 102 वर्षांचे जगद‍्गुरू डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर यांच्या नेतृत्वाखाली हा एल्गार होता. सर्वपक्षीय, धर्मियांचा या लढ्याला पाठिंबा आहे. त्यानुसार धर्ममान्यतेशिवाय गप्प बसणार नाही, प्रसंगी दिल्लीचे तख्तही उलटू, असा इशारा डॉ. शिवाचार्य यांनी दिला. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते विजयनगर असा सुमारे सहा  किलोमीटरहून अधिक रस्ता गर्दीने भगवेमय झाला होता. 

मेळाव्यास बसवजय मृत्यूंजय महास्वामी, दिल्ली पीठाचे जगद‍्गुरू चन्‍नबसवानंद महास्वामी, कोरुनेश्‍वर महास्वामी, नागनूर महास्वामी आदी प्रमुख उपस्थित होते. मेळाव्याचे संयोजन अखिल भारतीय लिंगायत महामोर्चा समन्वय समितीचे सुधीर सिंहासने, अविनाश भोसीकर, सुशील हडदरे, प्रदीप वाले, विश्‍वनाथ मिरजकर यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकार्‍यांनी केले होते. मेळाव्यास सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, विजापूरसह विविध जिल्ह्यातून बांधव उपस्थित होते. यावेळी महामोर्चासमोर कु. ऋतिका पाटील-गाडीवान, कल्याणी कुंभार, रसिका बोडके, समृद्धी केरिपाळे या चार तरुणींनी केलेल्या भाषणाला घोषणाबाजीने उपस्थितांनी दाद दिली. ‘महात्मा बसवेश्‍वर आणि लिंगायत सारा एक’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. 

डॉ. शिवाचार्य म्हणाले, गेल्या 1953 मध्ये स्वतंत्र लिंगायत धर्माची मान्यता होती, त्याचा मीही साक्षीदार आहे. परंतु त्यानंतर मान्यता रद्द केली. आमची रद्द केलेली मान्यता परत द्या, यासाठी लढा सुरू आहे. आजचा एल्गार हा एक नमुना आहे. आम्ही सहा प्रांतात आहोत. त्यामुळे सरकारने वेळीच याची दखल घेऊन निर्णय घ्यावा. मान्यता घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. 

सिंहासने म्हणाले, ज्या बसवेश्‍वरांनी जगाला समतेचा, पुरोगामित्वाचा संदेश देणारा लिंगायत धर्म निर्माण केला, त्याला सरकार मान्यता देत नाही. लिंगायत समाज पहिल्यांदाच रस्त्यावर उतरला 
आहे. आमच्यासोबत सर्वच सत्ताधारी, विरोधक आमदार, खासदार उतरले आहेत. त्यांनी हा प्रश्‍न संसदेत, विधिमंडळात मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले आहे. 

पण नुसते आश्‍वासन नको. कर्नाटक सरकारने दखल घेऊन धर्ममान्यतेसह अल्पसंख्याक दर्जाचा ठराव करून केंद्र सरकारकडे पाठवायचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रानेही तो करावा. अन्यथा लिंगायतांचा थ्रीफेज झटका आम्हाला अदखलपात्र समजणार्‍यांना सहन होणार नाही. निर्णय न झाल्यास त्याची झलक 2019 च्या निवडणुकीत दिसेल.

राज्याचे नेते अविनाश भोसीकर म्हणाले, दक्षिण भारतात लिंगायत आठ कोटी आहे. त्यानुसार आता लिंगायत धर्ममान्यतेसाठी सुरू असलेल्या लढ्याची शासनाने दखल घ्यावी. आमची लढाई सरकारशी नव्हे तर व्यवस्थेशी आहे.  त्यामुळे लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आता सांगली झाकी है, अभी मुंबई, दिल्ली बाकी है. आमच्या संयमाचा अंत पाहू नका,  अन्यथा लोकसभा, विधानसभेलाही आम्ही ताकद दाखवू.  नामदेव करगणे यांच्यासह अनेक मान्यवरांची भाषणे झाली. प्रदीप वाले यांनी आभार मानले. 

विश्रामबाग चौकात सभेनंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा निघाला. दहा महिलांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांना निवेदन दिले. 

संयोजनासाठी विनायक शेटे, अशोक पाटील, संजय मेंढे, महादेव कुरणे, डी. के. चौगुले, समन्वय समितीचे सचिव सतीश मगदूम, विशाल दुर्गाडे, आप्पा रिसवडे, योगेश कापसे, मिलिंद साखरपे, संजीव पट्टणशेट्टी, बाबासाहेब आळतेकर, सचिन घेवारे, प्रदीप दडगे, नगरसेवक शिवराज बोळाज, रविंद्र केंपवाडे, प्रदीप पाटील, दिलीप देसाई आदींनी परिश्रम घेतले. 

उद्योजक, व्यापारी राबले

मोर्चाचे गेल्या महिन्याभरापासून नियोजन सुरू होते. समितीसोबत त्यासाठी प्रचाराबरोबरच रस्त्यावर उतरून नियोजनासाठी राबले. सुशील हडदरे, डी. के. चौगुले, रविंद्र केंपवाडे, डी. के. चौगुले, ए. के. चौगुले, संजीव पट्टणशेट्टी, राजकुमार पाटील, एन. व्ही. तायशेट्टी आदींनी ग्राऊंड लेव्हलवर उतरून राबता ठेवला. त्यातूनच मोर्चा यशस्वी पार पडला.