Sun, Apr 21, 2019 13:47होमपेज › Sangli › लिंगायत महामोर्चा सांगलीत रेकॉर्डब्रेक करेल

लिंगायत महामोर्चा सांगलीत रेकॉर्डब्रेक करेल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येत्या 3 डिसेंबररोजी सांगलीत होणारा विभागीय लिंगायत महामोर्चा अन्य जिल्ह्यातील गर्दीचे रेकॉर्ड मोेडेल, असा विश्‍वास बोर्डिगचे अध्यक्ष सुधीर सिंहासने यांनी व्यक्‍त केला. लिंगायत बोर्डिंगमध्ये जिल्हा संपर्क कार्यालयाचे समाजाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब घेवारे यांच्याहस्ते बसवेश्‍वर प्रतिमापूजन करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. धर्मासाठी रस्त्यावर उतरण्याची ही वेळ आहे. त्यामुळे पुढच्या पिढीसाठी व्यवसाय धंदे सोडून सहा दिवस फक्‍त नियोजनासाठीच राबू, असे ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. विश्‍वनाथ मिरजकर, प्रदीप वाले, सुशील हडदरे, महादेव कुरणे, शिवराज बोळाज, नामदेव करगणे, प्रा. डॉ. जयश्री पैलवान आदी प्रमुख उपस्थित होते.

सिंहासने म्हणाले, स्वातंत्र्यानंतरही 1953 पर्यंत असलेली धर्ममान्यता सरकारने रद्द केली. त्यामुळे 50 वर्षे लढा सुरू आहे. धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जा, पोटजातींना आरक्षण यासाठी हा अखेरचा लढा आहे. मराठा, मुस्लिम, दलित बांधवांसह सर्व समाज, संघटनांनी पाठबळ दिले आहे. कर्नाटकात महामोर्चामुळे मंत्रिमंडळात आता धर्ममान्यता, अल्पसंख्याक दर्जाचा निर्णय घेतला आहे. महामोर्चाने सरकारला जाग आणू.

माजी नगरसेवक महादेव कुरणे म्हणाले, लिंगायत मोर्चासाठी आता रात्रीचा दिवस करा. शासनाला आवाज ऐकावाच लागेल, अशी ताकद दाखवू. नगरसेवक संजय मेंढे म्हणाले, मोर्चा नव्हे ही भविष्यासाठी लढाई आहे. आता फक्‍त 3 तारीख टार्गेट ठेवा. यावेळी अविनाश भोसीकर, आण्णाप्पा कोरे, अशोक पाटील, डॉ. जयश्री पैलवान, प्रमोद इनामदार, आप्पा रिसवडे, रवींद्र केंपवाडे, प्रा. निलेश भंडारे, दिलीप देसाई, श्रीकांत महाजन, प्रा. आंबोळे, सतीश मगदूम आदी उपस्थित होते.