Tue, May 21, 2019 04:05होमपेज › Sangli › एकवटला अवघा लिंगायत बांधव

एकवटला अवघा लिंगायत बांधव

Published On: Dec 04 2017 1:35AM | Last Updated: Dec 04 2017 1:35AM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

येथील लिंगायत समाज महामोर्चाला समाज बांधवांची अलोट गर्दी झाली होती. भगव्या टोप्या,  झेंडे, उपरणे,  फेटे यामुळे सर्वत्र वातावरण भगवेमय  झाले होते.  कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाच्याही पुढे विजयनगरपर्यंत रस्ते गर्दीने फुलले होते. लिंगायत समाजाला धर्माची मान्यता द्या, या मागणीचा सर्वत्र एकच जयघोष सुरू होता. 

लिंगायत समाजाच्या मोर्चाची वेळ सकाळी अकराची देण्यात आली होती. मात्र सकाळी नऊपासूनच लोक मोर्चाच्या ठिकाणी येत होते.   सकाळी आठपासूनच या मार्गावरील वाहतूक बंद करून इतर मार्गाने वळवण्यात  आली होती. सकाळी दहापासूनच लोकांची गर्दी विश्रामबाग चौकात वाढत होती. विविध वाहनांतून लोक सहकुटुंब मोर्चाच्या ठिकाणी येत होते. या मार्गावर भगव्या रंगाचे झेडे, फलक लावण्यात आले होते. त्या शिवाय येणार्‍या प्रत्येक दुचाकी, चारचाकी वाहनांवर लिंगायत समाज महामोर्चाचे स्टीकर लावण्यात आले होते. मोर्चाच्यासाठी लोक समुहाने घोषणा देत येत होते. त्यामुळे सर्वत्र   भगवेमय वातावरण झाले होते. आष्टा, इस्लामपूर मार्गावरून आलेली वाहने मार्केट यार्डात लावण्यात आली होती. कोल्हापूरकडून आलेली  वाहने नेमिनाथनगर येथील मैदानावर लावण्यात आली होती. जत, मिरज आणि कर्नाटक सीमाभागातून आलेली वाहने भोकरे संकुल, विलिंग्डन आणि चिंतामणराव   व्यापार महाविद्यालयाच्या  मैदानावर  लावण्यात आली होती. त्या ठिकाणाहून लोक चालत विश्रामबाग चौकाकडे येत होते. काही लोकांनी वाहने शंभरफुटी रस्ता, टाटा पेट्रोल पंपापाठीमागील रस्ता आणि अंतर्गत रस्त्यावर लावलेली होती. या मोर्चात लहान मुले, महिला, वृद्ध यांची उपस्थिती लक्षवेधी होती. 

विश्रामबाग चौकात अकरापासून लोक रस्त्यावर बसून ठाण मांडून होते. भाषणे सुरू झाल्यानंतर त्याला लोकांच्याकडून दाद मिळत होती. घोषणांनाही जोरदार प्रतिसाद मिळत होता.

सर्वपक्षीय नेत्यांची मांदियाळी

सांगली : प्रतिनिधी

लिंगायत महामोर्चात सर्वपक्षीय नेत्यांनीही रस्त्यावर उतरून सहभाग घेतला. लिंगायत आरक्षण, अल्पसंख्याक दर्जा आणि पोटजातींच्या आरक्षणाबाबत संसद आणि विधिमंडळ अधिवेशनातही आवाज उठविण्याचे आश्‍वासन नेत्यांनी दिले. यावेळी नुसते आश्‍वासन नको. कृती झालीच पाहिजे, असा आग्रह नेत्यांनी धरला.

पश्‍चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटकातील लाखो लिंगायत बांधव रस्त्यावर उतरले होते. त्याला पाठिंबा देण्यासाठी कर्नाटकाचे पाटबंधारे मंत्री एम. बी. पाटील, खासदार संजय पाटील, राजू शेट्टी, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, सुमनताई पाटील, आ. उल्हास पाटील, काँग्रेसनेत्या जयश्री पाटील, वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, उपमहापौर विजय घाडगे, उपमहापौर गटाचे नेते शेखर माने, मनपा गटनेते किशोर जामदार, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते, माजी महापौर सुरेश पाटील, काँग्रेसचे नेते सिद्धार्थ जाधव, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभुते, जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, माजी उपमहापौर प्रशांत मजलेकर आदी उपस्थित होते.

विविध संस्था, संघटनांकडून पाणी, खाद्यांचे वाटप 

सांगली : प्रतिनिधी

लिंगायत मोर्चाच्या ठिकाणी केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, मराठा सेवा  संघ, काही मुस्लीम संघटना आदींनी पाणी, खाद्यपर्थांचे वापट करण्यासाठी ठिक-ठिकाणी स्टॉल लावले होते.

मार्केट यार्डातील लिंगायत व्यापारी संघटनेकडून  पाणी आणि खाद्यपदार्थ वाटपाचा स्टॉल लावण्यात आला होता.  केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट तर्फे महामोर्चाच्या परिसरात पाच ठिकाणी स्टॉल लावण्यात आले होते. राज्य औषध व्यवसाय परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील, बिपीन हारुगडे, संदीप पाटील, महावीर खोत, सचिन सकळे, अजित सकळे, दीपक मगदूम आदी यामध्ये सहभागी झाले होते. 

स्वयंसेवकांच्या कडून नियोजन असल्याने गर्दी न होता व्यवस्थीत वाटप होत होते. आसिफ बावा, लालू मेस्त्री, युसूफ जमादार, शेरू सौदागर, पापा बागवान, रज्जाक नाईक, करीम मेस्त्री, अय्याज शेख, उमर गवंडी, हाफिज महंमदअली, मुनीर पट्टेकरी, तौसीफ मुन्सी आदी उपस्थित होते.

महिलांची लक्षणीय गर्दी

सांगली : प्रतिनिधी

लिंगायत समाजाला धर्ममान्यता मिळावी तसेच अल्पसंख्याक दर्जा मिळावा, या मागणीसाठी लिंगायत समाज पहिल्यांदाच मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला होता. यामध्ये महिला युवती व मुलींची संख्या लक्षणीय होती. ‘मी लिंगायत’, अशा भगव्या रंगाच्या टोप्या व फेटे परिधान केलेले होते. ‘शरणू, शरणार्थी’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. 

मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. महिला व मुलींनी डोक्यावर ‘मी लिंगायत’ अशा टोप्या परिधान केलेल्या होत्या. विश्रामबाग चौकात जिल्ह्यातून आलेल्या महिला रस्त्यावर बसलेल्या होत्या. यामध्ये लहान मुलींपासून वृद्धांपर्यंत समावेश होता. 

लिंगायत समाजाचा पहिल्यांदाच मोठा मोर्चा निघाला. बहुसंख्य लोक मोर्चासाठी विश्रामबाग चौकात दाखल झाले होते. त्यासाठी शिस्तबद्द कार्यकर्त्यांची फौज कामाला लागली होती. पाणी वाटप करणे, लोकांना रांगेने जाण्याच्या सूचना करणे यासाठी कार्यकर्ते झटत होते. मार्केट यार्डपासून विश्रामबागपर्यंत लोकांची गर्दी होती. यामध्ये लोक लहान मुलांनाही सोबत घेऊन आले होते.