Sun, May 26, 2019 11:28होमपेज › Sangli › तासगाव तालुक्याला अवकाळीने झोडपले

तासगाव तालुक्याला अवकाळीने झोडपले

Published On: May 08 2018 1:56AM | Last Updated: May 07 2018 11:42PMसांगली / तासगाव / आटपाडी :  प्रतिनिधी 

तासगाव शहरासह तालुक्याला रविवारी मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने झोडपून काढले. सांगली, मिरज, पलूस, कडेगाव, वाळवा तालुक्यांतही हलका पाऊस पडला. जिल्ह्यात सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. तापमानात काहीशी घट झाल्याने उकाडा कमी झाला. पुढील आठवड्यात वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्‍त केली आहे.

जिल्ह्यात गेल्या 15-20 दिवसांपासून तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत गेला आहे. वातावरणात प्रचंड उष्मा निर्माण झाला आहे. उन्हाळी पावसाला अनुकूलता तयार झाली आहे. 

यामुळे रविवारी मध्यरात्री जिल्ह्याच्या अनेक भागांत विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह पाऊस पडला. तासगाव व पलूस तालुक्यांतील काही भागांत जोरदार पाऊस झाला. तासगाव शहरासह तालुक्याच्या पूर्वेकडील गावे, सावळज परिसरला अवकाळी पावसाने झोडपले. 

अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून विजेच्या तारांवर पडल्या.  काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली.  शेतात पाणी साचले होते. विजेच्या तारा तुटून रस्त्यावर पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला. आटपाडी तालुक्यात वादळी वार्‍यासह विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. आटपाडी तलावानजिकच्या लिंगे वस्तीवर वीज कोसळून जगन्नाथ महादेव लिंगे यांच्या सात शेळ्या मृत्युमुखी पडल्या.  70 ते 80 हजारांचे नुकसान झाले. पशुवैद्यकीय अधिकारी गाडवे यांनी पंचनामा केला. तालुक्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. वार्‍याने अनेक घरांवरील पत्रे उडून गेले.

सांगली, मिरज शहरात मध्यरात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास हलका पाऊस पडला. वाळवा, कडेगाव तालुक्यातही हलका शिडकावा झाला. मिरज पूर्व भागात किरकोळ सरी पडल्या.  पूर्व भागात मात्र कोठेही पाऊस पडला आहे. 

पावसामुळे जिल्ह्यातील वातावरणात बदल झाला आहे. हवेत गारवा निर्माण झाल्याने तापमानात घट झाली आहे. कमाल 42 वर असणारा पारा 40 पर्यंत घसरला आहे. किमान तापमान 28 वरुन 24 अंश सेल्सिअस झाले आहे. वार्‍याचा वेग 16 ते 20 वरुन 28 ते 30 प्रतिकिलोमीटर झाला आहे. हवेतील आर्द्रता 25 ते 30 टक्केवरुन 49 ते 80 टक्केपर्यंत वाढली आहे. सर्वत्र ढगाळ वातावरण आहे. पुढील आठवड्यात तापमान 39 पर्यंत कमी होण्याची व वादळी वार्‍यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.