Fri, May 24, 2019 20:32होमपेज › Sangli › कुंडलवाडी येथील तरुणास आईच्या खुनाबद्दल जन्मठेप

कुंडलवाडी येथील तरुणास आईच्या खुनाबद्दल जन्मठेप

Published On: May 11 2018 2:16AM | Last Updated: May 10 2018 11:48PMइस्लामपूर : वार्ताहर

भावाच्या लग्‍नास आईचे अनैतिक संबंध आड येत असल्याच्या कारणातून तिचा खून केल्याप्रकरणी अर्जुन शिवाजी सुतार (वय 22, रा. कुंडलवाडी, ता. वाळवा) याला  गुरुवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. राणी शिवाजी सुतार (वय 45) असे या खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ही घटना दि. 20 एप्रिल 2017 रोजी घडली होती. न्यायाधीश श्रीमती के.एस.होेरे यांनी हा निकाल दिला. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर केवळ 9 महिन्यातच या खटल्याचा निकाल लागला. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. शुभांगी पाटील यांनी काम पाहिले.

राणी सुतार यांच्या पतीचे 20 वर्षापूर्वी निधन झाले होते. त्यांना अर्जुन व प्रकाश अशी दोन मुले. राणीचे गावातीलच मारूती आण्णा सुतार याच्याबरोबर सूत जमले होते. हे आईचे अनैतिक संबंध मुलांना मान्य नव्हते. राणी या मारूती सुतार याच्याबरोबर दोन वर्षे बाहेर पळून गेल्या होत्या. त्यानंतर गेली काही वर्षे ते दोघेजण गावातच पती-पत्नीसारखे राहत होते.  अर्जुन व प्रकाश हे त्यांच्या आजीसमवेत राहत होते.

अर्जुनचा भाऊ प्रकाश याच्या लग्‍नाची चर्चा सुरू होती. पाहुण्यांकडून मुलांच्या आई-वडिलांची चौकशी होत असे. परंतु आईच्या अनैतिक संबंधाची माहिती समजल्यानंतर लग्‍न ठरत नव्हते. आईचे अनैतिक संबंध लग्‍नाला आड येतात याचा राग अर्जुनला होता.

याच कारणातून तो वेळोवेळी आईला गाव सोडून जाण्यास सांगत होता. ‘तुम्ही गाव सोडले नाही तर तुला जीवंत सोडणार नाही’, अशी धमकीही त्याने आईला दिली होती. दि. 20 एप्रिल 2017 रोजी रात्री 8.30 वाजता राणी या आठवडा बाजारातून घरी चालल्या होत्या.  गावातील चांदणी चौकातील  पिरसाई वाड्याजवळ अर्जुन याने त्यांना अडवून धारदार विळ्याने त्यांच्या मानेवर आणि छातीवर जोरदार वार केले. त्यांचा जागेवरच  मृत्यू झाला. 

कुरळपचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय हारुगडे यांनी या प्रकरणाचा तपास करून आरोपपत्र दाखल केले होते.  सरकारी पक्षातर्फे  10 साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने खून प्रकरणी अर्जुन याला दोषी धरून जन्मठेप व 2 हजार रुपये दंड आणि दंड न दिल्यास एक महिना सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली.  सरकारी पक्षाला पोलिस कॉन्स्टेबल संदिप पाटील, चंद्रकांत शितोळे यांचे सहकार्य लाभले.

या खून खटल्यात तपास अधिकारी, सरकारी पंच, छायाचित्रकार यांच्या साक्षी ,  वर्दी जबाब व  पंचनामा ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. हे कृत्य आई व मुलगा यांच्या नात्यास काळीमा फासणारे आहे.  त्यामुळे आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी असा युक्तीवाद अ‍ॅड. शुभांगी पाटील यांनी सरकारी पक्षातर्फे केला होता.