Sat, Jul 20, 2019 15:49होमपेज › Sangli › भावाच्या खुनाबद्दल तरूणास जन्मठेप 

भावाच्या खुनाबद्दल तरूणास जन्मठेप 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : वार्ताहर 

किरकोळ कारणावरून सख्ख्या भावाचा खून केल्याबद्दल  सुरेश परसाप्पा वालीकर (वय 40, रा. गोंधळेवाडी, ता. जत) याला जन्मठेप व  एक हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायाधीश विद्याधर  काकतकर यांनी सुनावली. सरकारपक्षातर्फे  अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अरविंद देशमुख यांनी काम पाहिले. सीताराम उर्फ  अप्पू परसाप्पा वालीकर असे खून झालेल्याचे नाव आहे. गोंधळेवाडी येथे परसाप्पा यमणाप्पा  वालीकर यांना चार मुले होती. त्यापैकी  सर्वात धाकटा मुलगा  सुरेश हा कामधंदा करीत नव्हता. त्याला दारूचे व्यसन लागले होते. तो त्याच्या पत्नी- मुलांना सांभाळत नव्हता. त्यांच्या भांडखोर व व्यसनी प्रवृत्तीमुळे वडिलांनी त्याला घराबाहेर काढले.   थोरला मुलगा सीताराम याला त्यांचे संख येथील घर राहण्यासाठी दिले  होते. त्यामुळे सुरेश हा त्याचा भाऊ सीताराम व वडील परसाप्पा  यांच्यावर चिडून  होता. 

आई आजारी असल्याने तिला बघण्यासाठी सीताराम दि. 2 ऑगस्ट 2016 रोजी गोंधळेवाडी येथे आला होता. त्यावेळी सुरेश, परसाप्पा व सीताराम यांच्यात वाद झाला होता. सुरेश  वडील व भावाला शिवीगाळ करीत अंगावर धावून गेला होता.‘सीतारामला  दिलेले संख येथील  घर परत घ्या नाही तर त्याला  खलास करीन’,  अशी धमकी  देत, त्याने आई  भौरव्वा  हिला  घरात कोंडून घातले. सायंकाळी पाचच्या दरम्यान परसाप्पा   यांनी खोलीचा दरवाजा तोडून भौरव्वा यांची सुटका केली.  त्यावेळी सुरेश व परसाप्पा यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर  संतप्‍त झालेल्या सुरेशने  घरातून सुरी घेऊन परत आला आणि  त्याने काही न बोलताच सीतारामच्या पोटावर सपासप वार केले.  एक वार वर्मी लागल्याने सीताराम गंभीर जखमी झाला. दवाखान्यात नेत असतानाच  रस्त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

याप्रकरणी उमदी पोलिसात वडील परसाप्पा यांनी मुलगा सुरेश याच्या विरोधात फि र्याद दिली होती.तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक सपांगे यांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले होते.  या खटल्यात सरकारपक्षातर्फे   नऊ साक्षीदार तपासण्यात आले.  सीतारामची आई भौरव्वा व मुलगी धानव्वा  यांची साक्ष ग्राह्य धरून न्यायालयाने  सुरेशला शिक्षा सुनावली. सुनावणी दरम्यान फि र्यादी परसाप्पा फि तूर झाला होता. न्यायालयाने  सुरेशला  भा.दं.वि. कलम 302 अन्वये जन्मठेप व कलम  504 अन्वये एक वर्ष सक्त मजुरी व एक  हजार  रूपये दंडाची शिक्षा  सुनावली. दंड न भरल्यास एक महिना जादा शिक्षा भोगण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सरकारपक्षाला  हवालदार गणेश वाघ यांनी सहकार्य केले. 

Tags : Sangli, Sangli News, Life imprisonment, brothers murder 


  •