होमपेज › Sangli › जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने

जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवाने

Published On: Aug 30 2018 1:29AM | Last Updated: Aug 30 2018 12:28AMसांगली : प्रतिनिधी

नदीतील वाळू उपशावर बंदी कायम आहे. त्यामुळे वाळू महागली असून, बांधकामे ठप्प झाली आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने क्रश्ड् वाळू मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जिल्ह्यात 50 दगड खाणींना परवानगी दिली आहे, अशी माहिती अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ते म्हणाले, हरित न्यायालयाच्या निर्णयानुसार पाण्यातील वाळू काढण्यास बंदी कायम आहे. त्यामुळे क्रश्ड् वाळू वापरण्यास सुरुवात झाली आहे. ही वाळू नैसर्गिक वाळूपेक्षा जादा क्षमतेची असल्याचे तांत्रिकद‍ृष्ट्या सिद्ध झाले आहे. जिल्ह्यातील सिंचन योजना व महामार्गांच्या कामांसाठी आता ती  100 टक्के वापरली जात आहे. 

ही वाळू कमी पडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जादा दगड खाणींना परवानगी दिली आहे. 2015-16 मध्ये जिल्ह्यात केवळ 7 खाणी सुरू होत्या. 2016-17 मध्ये त्या 16 झाल्या. 2017-18 मध्ये 33 खाणींना परवाने दिले होते. 2018-19 मध्ये ही संख्या 36 केली होती; पण क्रश्ड् वाळूची मागणी वाढत असल्याने ही संख्या यंदा 50 करण्यात आली आहे. यातून प्रशासनाला 60 कोटी रुपयांचा महसूल मिळणे अपेक्षित आहे.  यामध्ये मिरज  9, तासगावमधून 6, कवठेमहांकाळमधून 6, जत  6, खानापूर 5.5, आटपाडी 5.5, कडेपूर 5, पलूस  5, वाळवा 9 आणि शिराळा तालुक्यातून 3 कोटी महसुलाचे उद्दिष्ट   ठेवले आहे. 

पाटील म्हणाले की, जिल्ह्यात अनेक राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. त्यासाठी लागणारा मुरुम, खडी, माती ही खासगीबरोबरच शासकीय जमिनीतून उपलब्ध करुन दिली जाणार आहे. त्यासाठी तलाव, गायरान जमिनींचा उपयोग केला जाणार आहे.  कंत्राटदारांनी रितसर मागणी केल्यास दगड खाणींनाही परवानगी दिली जाणार आहे.