Sat, Apr 20, 2019 09:58होमपेज › Sangli › शेतकर्‍यांची पीकविम्याकडे पाठ

शेतकर्‍यांची पीकविम्याकडे पाठ

Published On: Jul 19 2018 1:39AM | Last Updated: Jul 18 2018 8:13PMनिंबळक : किरण निकम

तासगाव तालुक्यातील निंबळक, चिखलगोठण, आळते, लिंब आणि बोरगाव परिसरातील शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा आणि पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेकडे पाठ फिरवली आहे. या भागातील शेतकर्‍यांनी सन 2017-18 च्या हंगामात नुकसान होऊनदेखील भरपाई न मिळाल्याचा हा परिणाम असल्याचे चित्र आहे.या सार्‍या भागात मागील वर्षी  खरीप हंगामातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेत  जवळपास अडीच ते तीन लाख रुपयांचा विमा शेतकर्‍यांनी उतरला होता. सोयाबीन, उडीद, मूग, भुईमूग, ज्वारी या पिकासाठी   जिल्हा मध्यवर्ती  बँकेच्या बोरगाव आणि  आळते या शाखांमध्ये ही रक्कम शेतकर्‍यांनी भरलेली होती. 

शेतकर्‍यांच्या पिकांचे नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास त्याला यातून लाभ दिला जाण्याची योजना आहे. तालुक्यात मागील वर्षीच्या  खरीप हंगामात अपुर्‍या पावसाने दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. तर शासनाने जिल्ह्यातील बहुसंख्य गावांची आणेवारी 50 टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे  शासनाने जाहीर केले होते. पिकांचे नुकसान होऊन खरीप वाया गेला होता. तरी देखील या भागातील  बहुसंख्य शेतकरी प्रधानमंत्री पीकविमा योजनेपासून मिळणार्‍या लाभापासून वंचित राहिले.

प्रधानमंत्री पीकविमा योजनेत पावसाने पीक वाया जाणे, दुबार पेरणी करावी लागल्यास, पीक  काढणीनंतर दोन आठवड्यात पावसाने नुकसान झाल्यास,  गारपीट, अतिवृष्टी, कीडरोगाने  नुकसान अशा विविध प्रकारच्या नुकसानीनंतर पीकविमाधारक शेतकर्‍यांना भरपाईस पात्र ठरविले. संबंधित विमा  कंपनीकडून शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतीची  पाहणी करून पीकविमा रक्कम परतावा दिला जातो. प्रत्येक मंडलनिहाय पैसेवारी काढण्याच्या पध्दतीने शेतकर्‍यांच्या पिकांचा नुकसानीचा अंदाज सरासरीने काढला जातो, यातून नुकसानीमध्येही तफावत येत आहे.  त्यासाठी गावनिहाय पैसेवारी नुकसानीचा विचार करून पीकविमा योजनेत ग्रामपंचायतीचा अनिवार्य अवलंब करावा, पीकनिहाय  पैसेवारी नियम, निकष वेगवेगळे असावेत, पैसेवारी निश्‍चितीसाठी महसूल, पुनर्वसन व कृषी विभाग यांचा समन्वय साधावा, अशी मागणी होत आहे.