होमपेज › Sangli › कुष्ठरोग बरा झाला...समाजमन कधी बदलणार?

कुष्ठरोग बरा झाला...समाजमन कधी बदलणार?

Published On: Jan 30 2018 1:54AM | Last Updated: Jan 29 2018 8:22PMसांगली : गणेश कांबळे

पूर्वी ‘महारोग’ समजला जाणारा कुष्ठरोग आता प्रभावी उपचारामुळे बरा होतो आहे.  हा आजार संसर्गजन्य असला तरी तो अनुवंशिक नाही. त्यामुळे त्यांची पुढची पिढी मात्र निरोगी निपजत आहे. शासन आणि एनजीओच्या मदतीने कुष्ठरोग्यांची मुले, मुली शिकू लागली आहेत. कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत, तर कोणी नर्स. ‘आता आम्हाला भीक नको’ असे म्हणून ते स्वत:च्या पायावर उभी रहात आहेत. सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 मुले, मुली शिक्षण पूर्ण करून  चांगल्या ठिकाणी काम करीत आहेत. 

गेल्या 30 वर्षात वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे या आजारावर उपचार करण्यात येत आहेत.  त्यामुळे हा आजार बरा होत आहे. शारीरिक व्यंग असणार्‍या व्यक्‍ती आता सत्तरीत पोहोचल्या आहेत. त्यांची मुले आणि नातवंडांना कोणताही आजार नाही. त्यामुळे ते चांगले जीवन जगत आहेत.

कुष्ठरोग झाल्यानंतर त्यांना वाळीत टाकले जायचे. त्यांच्यासाठी 1968 मध्ये वसाहती निर्माण केल्या. वॉन्लेस हॉस्पिटल, रिचर्डस लेप्रसी हॉस्पिटल यांच्या माध्यमातून उपचार करण्यात येऊ लागले. कुष्ठरुग्णांच्या हक्कासाठी काम करणारे कॉ. शंकर पुजारी यांनी सांगितले की,  मिरज येथे मेघजीवाडी, अंबेवाडी वसाहत व सांगलीत महात्मा गांधी वसाहतीमध्ये कुष्ठरुग्णांची वस्ती आहे. सांगली जिल्ह्यात अशी सुमारे 1 हजार कुटुंबे राहतात.  या वसाहतीमध्ये 10 बाय 10 ची खोली आहे. त्यामध्ये एक कुटुंब राहते. त्यांच्यासाठी अंत्योदय , पेन्शन योजना सुरू आहे.

औषधोपचारामुळे हा रोग बरा झाला. मात्र शारीरिक व्यंग कायम राहिले. त्यांना मुले मात्र निरोगी झाली. ती शिकू लागली. कोणी सॉफ्टवेअर इंजिनिअर, कोणी नर्स झाले. कोणी आरोग्य खात्यामध्ये काम करते, तर कोणी खासगी कंपन्यामध्ये आहेत. 

शासनाचा पुढाकार.. योजना...

शासकीय रुग्णालयातील कुष्ठरोग विभागाच्या सहसंचालक  डॉ. भारती दळवी म्हणाल्या, कुष्ठरोग निर्मूलन व्हावे यासाठी शासनाच्यावतीने विविध राबविल्या जातात. शासकीय रुग्णालयात वेगळा विभाग आहे. पूर्वी हजारी 8 ते 9 रुग्ण सापडत होते. आता मात्र एक लाखाला सरासरी 8 ते 9 रुग्ण सापडतात. ‘सपना’ योजना राबविली जात आहे. शस्त्रक्रियेसाठी येणार्‍यांचा 8 हजार रुपये भत्ताही दिला जातो.