Tue, Oct 24, 2017 16:50होमपेज › Sangli › चांदोली परिसरात बिबट्याची दहशत

चांदोली परिसरात बिबट्याची दहशत

Published On: Oct 13 2017 2:00AM | Last Updated: Oct 12 2017 8:28PM

बुकमार्क करा

वारणावती : अष्पाक आत्तार

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील बिबटे दिवसेंदिवस अभयारण्याबाहेर येऊन मानवी वस्तीत शिरकाव करू लागले आहेत.शिवाय अन्नाच्या शोधार्थ परिसरातून भटकत आहेत. समोर येणार्‍या शेळ्या, मेंढ्या, गाई, वासरे, म्हशी यांच्यावर हल्ला करून त्यांना फस्त करू लागले आहेत. दिवसेंदिवस या हल्ल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वन विभागाच्या अधिकार्‍यांनी या घटनांकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. 

चोरमारेवाडीत बिबट्या घरात

चांदोली अभयारण्य परिसरात गेल्या महिनाभरात बिबट्याने गावातील पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्याच्या तब्बल पाच घटना घडल्या आहेेत. बिबट्याने हल्ला करून शेळी, वासरू तसेच गाईला ठार केले आहे. पंधरा दिवसांपूर्वी तर चोरमारेवाडी येथे एका घरात बिबट्या घुसला होता. घरमालकांनी घराचे दरवाजे बंद करून ठेवल्यामुळे रात्रभर बिबट्या घरातच होता. वनविभागाचे अधिकारी व पोलिसांना पाचारण केल्यानंतर त्यांनी या बिबट्याला पकडण्यासाठी सापळा रचला. मात्र बिबट्याने त्यांच्या हातावर तुरी देऊन पळ काढला.

आंबाईवाडी येथे नुकतीच अशी घटना झाली. तिथे वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. सोनवडे, मिरुखेवाडी, खुंदलापूर, धनगरवाडा या ठिकाणीही वारंवार प्राण्यांवर हल्ल्याच्या  घटना घडत आहेत. मात्र वन्यजीव संरक्षक विभाग अथवा सामाजिक वनीकरण विभागाकडून या घटनांची  गांभिर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसत नाही. नुकसानभरपाई म्हणून शेतकर्‍यांना नाममात्र रक्कम दिली जाते व विषय मिटवला जातो.

वारंवार अशा घटना घडू लागल्यामुळे अभयारण्य परिसरातील गावांतील लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. चांदोली व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळूनही गेल्या अनेक वर्षांपासून येथील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.सध्या उद्यानात चाळीसपेक्षा अधिक बिबटे आहेत. उद्यानात पुरेसे अन्न मिळत नसावे. त्यामुळे ते अन्नाच्या शोधार्थ मानवी वस्तीत शिरण्याचे धाडस करू लागले आहेत.

बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे  शेतकर्‍यांना शेतात जाणेही मुश्किल होऊ लागले आहे. झाडाझुडपात लपलेला बिबट्या अचानक शेळ्यांवर, मेंढ्यांवर हल्ला करू लागला आहे. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी अशी घटना घडली तर घटनास्थळी जातात. पंचनामा करतात. नुकसान भरपाई म्हणून नाममात्र रक्कम शेतकर्‍याला दिली जाते.गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे.

अभयारण्यातून बिबटे किंवा अन्य वन्यप्राणी बाहेर पडू नयेत यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. बिबट्यांना त्यांच्या वावर क्षेत्रातच भक्ष मिळावे यासाठी कोणतीही योजना अंमलात आणली जात नाही. त्यामुळे हल्ल्यांचे प्रकार असेच सुरू राहिले तर भविष्यात अभयारण्यालगतच्या गावांतील लोकांना तिथे राहणे कठीण होणार आहे. 

संरक्षक भिंतीचा विषय प्रलंबित

प्रकल्प क्षेत्रातील बिबटे व अन्य वन्यप्राणी उद्यानाबाहेर येऊ नयेत यासाठी उद्यानाला संरक्षक भिंत बांधण्याचा प्रश्‍न अनेक वेळा ऐरणीवर आला आहे. मात्र यावर कोणतीच कार्यवाही अद्याप झालेली नाही. चांदोली येथील वनक्षेत्रपाल पद गेल्या पाच महिन्यांपासून रिक्त आहे. त्यामुळे वनपाल व अन्य कर्मचारीच या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा कार्यभार हाताळत आहेत.