Wed, Apr 24, 2019 16:17होमपेज › Sangli › पोखर्णी भागात बिबट्याची दहशत

पोखर्णी भागात बिबट्याची दहशत

Published On: Aug 19 2018 1:33AM | Last Updated: Aug 18 2018 11:46PMबागणी : प्रतिनिधी

वाळवा तालुक्यातील पोखर्णी, बावचीसह सार्‍या टापूत दीड महिन्यांपासून बिबट्याची दहशत निर्माण  झाली आहे. या बिबट्याने आजअखेर डझनभर कुत्री, शेळ्या, बोकडांचा फडशा पाडला असल्याचे गावकरी सांगतात. दरम्यान, सातत्याने या बिबट्यासदृश्य प्राण्यांचे दर्शन होत असल्याने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे.

दीड महिन्यांपासून बिबट्यांचे पोखर्णीसह बावची, गोटखिंडी भागात दर्शन होत आहे. पोखर्णीपासून ते गोटखिंडी, मालेवाडी खिंडीपयर्ंंतचा सारा टापू हा डोंगराळ आहे. या सार्‍या परिसरात  मोठ्या प्रमाणात झाडी तर आहेच, खेरीज या भागात ऊस  क्षेत्र मोठे आहे. या सार्‍या भागातच गेल्या महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे गावकरी सांगत आहेत. 

पोखर्णी येथे गेल्या चार दिवसांपासून सातत्याने हा बिबट्या दिसत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. सोमवारी गावाबाहेरील एका वस्तीवर असलेल्या दोन शेळ्या आणि एका बोकडावर हल्ला करुन बिबट्याने त्यांना ठार केले. त्याचा पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकार्‍यांनी देखील पंचनामा केला असून हा हल्ला बिबट्यानेच केला असल्याचे या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोदय कारखान्याचे माजी संचालक नंदकुमार पाटील यांनी ही माहिती दिली.

ही घटना ताजी आहे तोपर्यंतच मंगळवारी सकाळी गावापासून काही अंतरावर असलेल्या क्रशर रोडवर एक  महिला शेताकडे  जात होती.  या महिलेवर बिबट्याने गुरगुरत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या धक्कयाने या महिलेने आरडाओरडा केला. आसपासचे लोक जमा झाले, यामुळे अनर्थ टळला असल्याचे गावकर्‍यांनी सांगितले. 

सोमवारी सायंकाळीच ग्रामदैवत मारुती मंदिराच्या पिछाडीस असलेल्या पाणंद रस्त्यावर शेजारच्या उसातून बिबट्या आल्याचे एका शेतकर्‍याने पाहिले. त्या मानसिक धक्क्याने संबंधित शेतकर्‍यावर उपचार करण्याची वेळ आली आहे.

प्रामुख्याने पोखर्णी भागात  कोल्ह्यांची संख्या अधिक आहे. सकाळ संध्याकाळ कोल्हेकुईचा आवाज गावापर्यंत यायचा, मात्र आता तो अजिबात ऐकू येत नाही. या भागात बिबट्या वावरत असल्याचा हा परिणाम असल्याचे गावातील वयोवृद्ध शेतकर्‍यांनी सांगितले. 

दरम्यान  नंदकुमार पाटील म्हणाले, या परिसरात बिबट्याचा वावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.  याबाबत आम्ही आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून वनविभागाकडे  बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. मात्र, वनविभाग काहीच हालचाल करीत नाही.  त्यामुळे भितीचे वातावरण आहे. एखादा अनर्थ घडल्यानंतरच वनविभाग आणि या विभागाचे अधिकारी जागे होणार आहेत का, असा संतप्त सवाल नंदकुमार पाटील यांनी केला.