Fri, Jul 19, 2019 01:42होमपेज › Sangli › घरपट्टी वसुलीमध्ये कायदेशीर अडचणी

घरपट्टी वसुलीमध्ये कायदेशीर अडचणी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

घरपट्टीचे 72 कोटी रुपयांचे टार्गेट गाठताना सबंधित विभागाची धावपळ होते आहे.  घरपट्टी विभागाने मार्चअखेर शर्थीचे प्रयत्न करून 40 कोटींपर्यंच मजल मारली. अद्याप 32 कोटींवर थकबाकी वसुलीत धार्मिक स्थळे, झोपडपट्ट्या, अवसायानात निघालेल्या बँका, पतसंस्था तसेच शासकीय इमारती, न्यायप्रविष्ट मालमत्तांच्या करवसुलीचा अडसर आला असल्याचे कर निर्धारक तथा संकलक चंद्रकांत अडके यांनी सांगितले. या मालमत्तांच्या थकबाकीचा आकडा 10 कोटींवर असल्याचे ते म्हणाले. मार्चअखेरची आता सवलत संपली आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी आता जप्तीमोहीम सुरू करण्यात येणार आहे.

ते म्हणाले, महापालिकेच्या एकूण सव्वा लाखांहून अधिक मालमत्तांची थकबाकी व चालू मागणी अशी 72 कोटी रुपयांची थकबाकी होती. त्या करवसुलीसाठी घरपट्टी विभागाने युद्धपातळीवर मोहीम राबविली. याअंतर्गत 40 कोटी रुपयांची करवसुली झाली आहे. मार्चअखेर आलेल्या धनादेशांतूनही एक कोटी रुपयांची रक्कम जमा होईल. त्यामुळे 41 कोटी रुपयांपर्यंत मजल मारली आहे. एकूण कराच्या हा आकडा 60 टक्क्यांवर गेला आहे.आडके म्हणाले,  करवसुलीत कायदेशीर अडचणींचाच मोठा अडथळा आहे. धार्मिक स्थळे, झोपडपट्ट्या याठिकाणी सुमारे 5 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. धार्मिक स्थळाचे ट्रस्टी, मालकांना याबाबत नोटिसा बजावल्या आहेत. खुले प्लॉट, शासकीय इमारती, न्यायप्रविष्ट व बेनामी मालमत्ता यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे.

ते म्हणाले, मोबाईल टॉवर्सचीही सुमारे 3 कोटी रुपयांहून अधिक थकबाकी आहे. त्यांनाही टॉवर सीलच्या नोटीसा बजावल्या आहेत. मार्चअखेर शास्ती आणि दंडात 50 टक्के सवलतीची मुदत होती. त्याचा अनेकांनी लाभ घेतलेला नाही. त्यामुळे आता संबंधितांना दंड-शास्तीसह संपूर्ण रक्कम भरावी लागेल.  सरसकट जप्ती आणि प्रसंगी महापालिकेचे मालमत्तांना नाव लावून लिलाव प्रक्रिया सुरू करू.आडके म्हणाले, लाख रुपयांवरील थकबाकी असणारे सुमारे 100 जण लिस्टवर आहेत. 

Tags : Sangli, Sangli News, Legal, Problems,  property, tax 


  •